15 July 2020

News Flash

उल्हासनगरातील बाजारपेठा खुल्या होणार

३ जुनपासून पावसाळा पूर्व तयारीची, तर ५ जुनपासून सर्वच दुकाने सुरू होणार

(संग्रहित छायाचित्र)

३ जुनपासून पावसाळा पूर्व तयारीची, तर ५ जुनपासून सर्वच दुकाने सुरू होणार

उल्हासनगर : करोनाच्या प्रादुर्भावामुळे १९ मार्चपासून बंद असलेली उल्हासनगर शहरातील दुकाने अखेर ७४ दिवसानंतर सुरू करण्याला महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. यात पावसाळापूर्व तयारीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची दुकाने ३ जुनपासून सुरू होणार असून ५ जुनपासून शहरातील सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक दुकाने मात्र सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच खुली राहणार आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरातील व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

दररोज सुमारे ५०० कोटींची उलाढाल असलेली उल्हासनगर शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी अखेर महापालिका प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे १९ मार्च रोजी पहिल्यांदा शहरातील बाजारपेठा तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर २२ मार्च रोजी जनता संचार बंदी आणि त्यानंतर टाळेबंदीमुळे दुकाने उघडण्याची संधी उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे जवळपास ४० हजारांपेक्षा अधिकची दुकाने आणि विविध प्रकारच्या बाजारपेठा बंद असल्याने गेल्या ७४ दिवसांत ३५ हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती उल्हासनगरच्या व्यापारी वर्गाकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शेजारच्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील बाजारपेठा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र घाऊक आणि किरकोळ अशा बाराजपेठा असलेल्या उल्हासनगरातील दुकाने सुरू होत नसल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

अखेर मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे यांनी शहरातील बाजारपेठा दोन टप्प्यात सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ३ जुनपासून पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी प्लबिंग, इलेक्ट्रिशीयन, छत्री, रेनकोट, ताडपत्री, हार्डवेअर, बांधकाम दुरूस्तीची दुकाने शर्तींनुसार सुरू करता येणार आहेत. तर ५ जुनपासून इतर सर्व बाजारपेठा, दुकाने सम आणि विषम सूत्रानुसार एक दिवसाआड सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासनाने वेळोवेळी सांगितलेल्या सर्व नियम आणि अटींचे यावेळी पालन करण्याची विक्रेता आणि ग्राहकांवर सक्ती असणार आहे.

सायकलचा पर्याय

तिसऱ्या टप्प्यात ८ जुनपासून खाजगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. तर बाजारपेठा उघडल्यानंतर मोटार वाहनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी सायकलचा वापर करण्याचा सुचवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 2:29 am

Web Title: markets will be open in ulhasnagar zws 70
Next Stories
1 धर्मगुरूच्या वाढदिवसामुळे भक्तांना करोनाबाधा
2 राष्ट्रगीताने करोना रुग्णांना निरोप
3 बारवी धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडलेलेच
Just Now!
X