प्रकाश पाटील pprakashvasai@gmail.com

‘च्या पान्या’चा कार्यक्रम : आगरी समाजात अजूनही विवाह सोहळे पारंपरिक पद्धतीने पार पाडले जातात. आधी नातेवाईकांकडून मुलीविषयी कळते किंवा एखाद्या लग्नात मुलीला पाहिल्यावर तिची चौकशी केली जाते. मग मुलाला कुणाच्या तरी घरी मुलगी दाखवली जाते. त्यानंतर मुलीच्या घरी ‘च्या पान्या’चा (चहापाण्याचा) कार्यक्रम होतो.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
संविधानभान: सकारात्मक भेदभाव म्हणजे काय?
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

साखरपुडा : ‘च्या पान्या’च्या कार्यक्रमात लग्नाची बोलणी पूर्ण होतात. यानंतर साखरपुडा ठरतो. या दिवशी मुलाकडील लोक मुलीकडे जातात. या वेळी विवाहाची तारीख पक्की करून तोंड गोड करण्यासाठी साखर वाटली जाते. (हल्ली पेढेही वाटले जातात.) पूर्वी जवळचे नातेवाईक मामा-मावशी, काका-काकी परिवार आणि आजूबाजूचे समाजबांधव अशा मोजक्याच मंडळींना साखरपुडय़ासाठी निमंत्रण असायचे. कधी कधी तर नवऱ्यामुलीच्या घरच्यांना भुर्दंड नको म्हणून चहापाण्याच्या कार्यक्रमातच साखरपुडा उरकला जायचा किंवा मांडवाच्या (हळदीच्या) दिवशीच साखरपुडय़ाचा विधी केला जायचा.

पूर्वी साखरपुडय़ासाठी नवरा मुलगा जात नसे; परंतु गेल्या काही वर्षांपासून साखरपुडय़ाच्या समारंभात दिखाऊपणाचे स्तोम वाढत चालले आहे. हल्ली नवरामुलगाही साखरपुडय़ाच्या कार्यक्रमास मित्रमंडळीसह जातो. सोबत ब्रास बँड आणि फोटोग्राफर्सचा ताफा असतो. पूर्वी साखरपुडय़ाला फार फार तर एखादी सोन्याची अंगठी दिली जायची; पण आता परिस्थितीनुसार मुलीला सोन्याच्या अंगठीबरोबरच सोन्याचा हार, सोन्याच्या बांगडय़ा व मुलाला सोन्याच्या अंगठीसोबत सोन्याचे ब्रेसलेट वगैरे भेट दिले जाते. नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रणे दिली जातात. त्यामुळे साखरपुडय़ाला कमीत कमी चारशे-पाचशे लोकांची उपस्थिती असते. स्वागताला ज्यूस व कोंबडी-मटणाच्या जेवणाची व्यवस्था असते. मुलीकडची परिस्थिती गरीब असेल तर हा अनावश्यक भार त्यांच्यावर पडतो.

पूर्वतयारी: साखरपुडय़ानंतर साधारणत: दोन ते तीन महिन्यांत लग्न असते. त्यामुळे एकदा साखरपुडा झाला की लगीनघाईला सुरुवात होते. लग्नासाठी मांडव (मंडप), डीजे व बँड बुक केला जातो. गजरे, वेण्या फुलांची ऑर्डर दिली जाते. सोनाराकडे मुलीसाठी गंथन (मंगळसूत्र) व मुलासाठी चैन बनवायला दिली जाते. लग्नासाठी स्वतंत्रपणे मसाला कुटला जातो. पापडय़ा काढून सुकवल्या जातात. तांदूळ, कडधान्ये व इतर सामान भरले जाते. तांदूळ व कडधान्ये निवडण्यासाठी समाजातील स्त्रिया लगीनघरी एकत्र येतात. त्याचप्रमाणे नवऱ्यामुलींसाठी, नातेवाईकांना भेट देण्यासाठी लुगडी, साडय़ा यांचा ‘बस्ता’ खरेदी करायला जातात. नवऱ्यामुलींसाठी लग्नाचा शालू मुलाकडून घेतला जातो, तर नवऱ्यामुलासाठी लग्नाचे कपडे मुलीच्या घरून घेतले जातात. (कालानुरूप यात आता प्री वेडिंग शूटचीही भर पडली आहे.) अशा प्रकारे पूर्वतयारी करता करता लग्नाची तारीख कधी जवळ येऊन ठेपते ते कळत नाही.

हळद/मांडव: हळदीच्या दिवसाला आगरी समाजात बहुतांश ठिकाणी ‘मांडव’ किंवा ‘मांडवाचा दिवस’ असे संबोधले जाते. हा लग्नाच्या आदला दिवस असतो. लग्नकार्यासाठी घरासमोरच मांडव (मंडप) घातला जातो. मंडपाच्या दोन्ही बाजूला केळीचे दोन खांब लोंगरासहित उभे करतात. केळीच्या दोन खांबांच्या मध्ये केळीच्याच खोडाचे उतार ठोकतात. लग्नातले विधी पार पाडण्यासाठी आजूबाजूच्या चार सुवासिनी ‘ओवाल्या’ म्हणून नेमलेल्या असतात. संपूर्ण लग्नाच्या विधीमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी ‘धवले’ (लग्नगीते) तोंडपाठ असलेली ‘धवलारीन’ बोलावली जाते. हिला सर्व विधींचीही माहिती असते.

घाणे कुटणे : हळदीच्या दिवशी सकाळी पहिला विधी होतो, तो ‘घाणे कुटण्याचा!’ नवऱ्याची आंघोळ झाल्यावर त्याच्या डोक्याला पाच ‘रोजा’च्या (झेंडूच्या) फुलांची मुंडावळ बांधून त्याला उखळासमोर पाटावर बसवतात. ‘ओवाल्या’ त्याला तांदूळ व झेंडूच्या फुलांनी पोखून (पायांना, गुडघ्यांना, खांद्याला स्पर्शून) आरती करतात. नवऱ्यामुलाला पहिली हळद लावली जाते. चार ‘ओवाल्या’ मुसळांनी उखळात घाणं (भात) कुटतात. यात बहुधा खारीतले (खाऱ्या जमिनीतल्या शेतातले) रात्याचे लाल तांदूळ वापरतात. या वेळी धवलारीन व ओवाल्या गाणं गातात.

मेडी पुंजा : त्यानंतरचा कार्यक्रम ‘मेडी पुंजण्याचा’ असतो. आंब्याच्या व उंबराच्या फांद्या मंडपाच्या घरालगतच्या बांबूला बांधून पूजतात व त्यांना मुसळे बांधतात. मेडी (खांब) पूजण्याआधी होम केला जातो.

देतकुन: घरात जिथे देवाचा मान ठेवतात त्या जागेला ‘देतकुन’ असे संबोधतात. आंब्याच्या व उंबराच्या फांदीच्या बेचक्या शहाळ्याच्या जोडव्यासोबत घरात ‘देतकुना’जवळ बांधतात. तिथे तांदूळ, प्रत्येकी नऊ  खारका, बदाम, हळकुंड, अक्रोड, सुपाऱ्या, केळी, झेंडूची फुले, पिठाचे दिवे असा देवाला मान ठेवला जातो. पापडय़ा, वडे यांचाही मान ठेवला जातो. तसेच घरातील आई-वडील जर स्वर्गवासी झालेले असतील तर सोबत त्यांचा कपडय़ाचा मान पाटावर ठेवला जातो. ज्या भिंतीला लागून देतकुन मांडलेले असते त्या भिंतीवर नवरा-नवरीचे घोडय़ावर बसलेले चित्र काढलेले असते. तिथे ‘ऐरी’ (एकूण अकरा मातीची छोटी मडकी), नवरीचा कडा (मातीचाच) आणि एक भोवरी फिरवायला मडके ज्याला ‘मुतऱ्या’ म्हणतात अशा ऐऱ्या मांडतात. अशा प्रकारे देतकुनाची व्यवस्थित मांडणी केलेली असते.