ऋषीकेश मुळे, ठाणे</strong>

नौकाविहार, घोडागाडीच्या भाडेदरात वाढ

उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाणेकरांचे हक्काचे पर्यटन ठिकाण असलेल्या मासुंदा तलावात नौकाविहार करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असून हा वाढता प्रतिसाद पाहून महापालिकेने नेमलेल्या नौकाविहार ठेकेदाराने दरांमध्ये वाढ केली आहे. पॅडल बोट, नॅनो बोट तसेच फॅमील बोट अशा नौकाविहाराच्या सगळ्याच प्रकारांचे दर किमान पाच ते दहा रुपयांनी वाढविण्यात आले आहे. याच परिसरात वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा ठरत असलेल्या घोडागाडी चालकांनीही आठवडाभरापासून रपेटीचे दर वाढविले असून शेवपुरी तसेच भेळ विक्रेत्यांनीही सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन दरांमध्ये तुरळक वाढ केली आहे. एकूणच मासुंदा तलावाचे पर्यटन ठाणेकरांसाठी महाग झाले आहे.

ठाणेकर आणि ठाणे शहरात येणाऱ्या पर्यटकांचे हक्काचे पर्यटनस्थळ म्हणून मासुंदा तलावाचा परिसर ओळखला जातो. हा तलाव ठाणे रेल्वे स्थानकापासून जवळ असून शहराच्या मध्यभागी स्थित आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या परिसरात फेरफटका मारायला येणाऱ्या ठाणेकरांची संख्या अजूनही मोठी आहे. गेल्या तीस वर्षांपासून अधिक काळ या ठिकाणी नौकाविहार सुरू आहे. पावसाचा हंगाम सोडला तर इतर काळात येथे सायंकाळच्या वेळेत नौकाविहाराची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नौकाविहाराचे व्यवस्थापन प्रेशीयन फिशरीज या व्यवस्थापनाकडे कंत्राट पद्धतीवर आहे.

या ठेकेदाराने उन्हाळय़ाच्या सुटीत वाढलेली गर्दी पाहून नौकाविहारासाठी जादा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. नौकाविहाराच्या दरात अर्धा तास कालावधीत प्रत्येक फेरीमागे प्रती व्यक्ती सुरुवातीच्या दरांपेक्षा पाच ते दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर तसेच तलाव देखभाल दुरुस्ती, तलावाचे व्यवस्थापन यांचा खर्च हा अधिक होत असल्याने ही अधिकची वाढ करण्यात आल्याचे नौकानयन व्यवस्थापनाने सांगितले.

दरम्यान, मासुंदा तलाव परिसरात मोठय़ा प्रमाणावर घोडागाडय़ा चालविल्या जातात. यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असली तरी सुट्टीच्या काळात ठाणेकर या गाडय़ांमधून रपेट मारताना दिसत आहेत. ही संधी साधून घोडागाडी चालकांनी एका रपेटीचे दर ५० रुपयांवरून थेट १०० ते १२० रुपयांपर्यंत वाढविले आहेत.

नवे दर (अर्धा तास)

  • पॅडल बोट ७० रु. (प्रती व्यक्ती)
  • नॅनो बोट १८० रु. (दोन व्यक्ती)
  • फॅमिली बोट ३५० रु. (चार व्यक्ती)
  • फेरी बोट २५ रु. (प्रती व्यक्ती)
  • कार बोट ३०० रु. (प्रती व्यक्ती)

सुरुवातीला आम्ही महापालिकेस १५ टक्के मनोरंजन कर भरत होतो. आता आम्ही १८ टक्के वस्तू आणि सेवा कर भरतो.  तसेच सर्व नौका या एलपीजी वायूवर चालतात. एलपीजी वायूचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही.

दिनानाथ ठाणेकर, प्रोप्रायटर- प्रेशीयन फिशरीज