लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीत मौलवींची मोलाची साथ
परदेशातील कंपन्यांनी तयार केलेली लस आपल्या धर्माच्या दृष्टिने निषिद्ध आहे, अशा विचारांतून आपल्या तान्हुल्यांना विविध आजारांच्या लस देण्यास नकार देणाऱ्या भिवंडीतील मोहल्ल्यांमध्ये केवळ अंधश्रद्धा आणि गैरसमजापायी जाणारे तान्हुल्यांचे बळी प्रशासनाला अधिक चिंतित करत होते. अखेर या अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी श्रद्धेची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आणि मुस्लीम मोहल्ल्यांत जनजागृतीसाठी मौलवींची फौजच उभी करण्यात आली. मशिदीत लावले जाणारे फलक, शुक्रवारच्या नमाजच्या वेळी केल्या जाणाऱ्या उद्घोषणा आणि आसपासच्या घरांमध्ये व्यक्तिगत भेटींतून केले जाणारे प्रबोधन यांच्या माध्यमांतून भिवंडीतील मोहल्ल्यांमधील पाच वर्षांपूर्वीचे चित्र आता पूर्णपणे बदलून टाकले आहे. मौलवींनीच केलेल्या मनपर्वितनामुळे समाजाकडून आता शासनाच्या लसीकरण मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
राज्यातील एकाही बाळाला पोलिओची लागण होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा तसेच महापालिका पातळींवर पोलिओ लसीकरण मोहिमा राबविण्यात येतात. भिवंडी महापालिकेकडून शहरात अशी मोहीम राबविली जाते, पण त्यास शहरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे घरोघरी जाऊनही पथकांना बालकांना लस देणे शक्य होत नव्हते. परदेशातील कंपन्यांनी तयार केलेली लस धर्माच्या दृष्टीने घातक असते आणि ती शासनाच्या विविध मोहिमांमध्ये राबविण्यात असल्याची अफवा समाजात पसरलेली. या अफवेमुळे कुणीच आपल्या बाळांना या लस देण्यास पुढे येत नव्हते. हे निराशाजनक चित्र पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्थानिक धर्मगुरूंचीच मदत घेण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील मौलवींना विश्वासात घेतले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लस आरोग्याला हितकारक आहेतच; पण त्यांचा धर्मातील मूल्यांनाही धोका नाही, हे त्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर या मौलवींनीच आपल्या समाजात जनजागृती करण्याचा विडा उचलला.
भिवंडीतील मुस्लीम समाजाच्या बैठका घेऊन त्यादरम्यान लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम मौलवी करतात. त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी नमाजच्या वेळी होणाऱ्या भाषणादरम्यान लसीकरणाबाबत जनजागृती केली जाते. लसीकरणाचा दिवस, ठिकाण आणि वेळेची सविस्तर माहिती दिली जाते. याशिवाय, मशिदीतील सूचना फलकावरही लसीकरणाच्या मोहिमेची माहिती दिली जात आहे. तसेच या मोहिमांना महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर हे प्रोत्साहन देत आहेत. यामुळे समाजाचे मनपरिवर्तन होऊन लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळू लागला असून गेल्या पाच वर्षांत लसीकरण न झालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटत चालली आहे.
इंद्रधनुष्य मिशन..
भिवंडी शहराची लोकसंख्या सात लाखांच्या घरात असून त्यात ६० टक्के मुस्लीम समाजाची लोकसंख्या आहे. त्याचबरोबर भिवंडीत यंत्रमाग उद्योग मोठय़ा प्रमाणात असल्याने स्थलांतरणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्थलांतरित बालकांना लस देण्यासाठी महापालिकेमार्फत इंद्रधनुष्य मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत आतापर्यंत ३०० शिबिरे घेण्यात आली असून त्यामध्ये पथके घरांना भेटी देऊन बालकांना लस देत आहेत. याशिवाय रेल्वे स्थानक, बस स्थानक तसेच वीटभट्टय़ा या भागात जाऊन पथके बालकांना लस दिली जाते.

लसीपासून वंचितांची संख्या
वर्ष बालके
२०११ १७३६
२०१२ १५६४
२०१३ ९२०
२०१४ ७६८
२०१५ ६६७
मोहिमेत ७५ हून अधिक मौलवींचा सहभाग असून त्यांच्या प्रचारामुळे आता मोहिमेला यश येऊ लागले आहे. ही मोहीम आता लसीकरणापुरती मर्यादित राहिलेली नसून साथ रोखण्यासाठीही मौलवींमार्फत जनजागृती केली जाते.
– डॉ. विद्या शेट्टी, मुख्य आरोग्य अधिकारी, भिवंडी महापालिका.