23 November 2017

News Flash

पाऱ्याची कमाल!

अतिवृष्टी अनुभवणाऱ्या ठाणेकरांना त्यानंतर भयंकर उष्म्याला सामोरे जावे लागत आहे.

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: September 12, 2017 2:04 AM

उन्हाच्या वाढत्या झळांनी गेल्या दहा दिवसांपासून ठाणेकरांना त्राही त्राही करून सोडले असतानाच, सोमवारी सायंकाळी गडगडत आलेल्या ढगांनी सर्वानाच सुखद धक्का दिला. यादरम्यान आकाश लालभडक झाले होते. पण पावसाची एखाददुसरी मोठी सर येऊन गेल्यानंतर वातावरणातील उकाडा आणखी वाढला.  (छायाचित्र : गणेश जाधव)

१५ दिवसांत कमाल तापमानात आठ अंशांची वाढ; उन्हाच्या झळांनी ठाणेकर हैराण

अवघ्या दहा-बारा दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुभवणाऱ्या ठाणेकरांना त्यानंतर भयंकर उष्म्याला सामोरे जावे लागत आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे सकाळी दहा वाजता मध्यान्हीच्या उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी रहिवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे या उन्हापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वार तोंडाला स्कार्फ गुंडाळून प्रवास करताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्याच पंधरवडय़ात ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा सोसाव्या लागत आहेत. अतिवृष्टीच्या दिवशी २५.६ अंश सेल्सियसवर असलेला कमाल तापमानाचा पारा रविवारी ३३.४ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे.

महिन्याभरापूर्वी ऑगस्टच्या मध्यावर पावसाने जोर धरला. गणेशोत्सवात तर भरपूर पाऊस पडला. २९ ऑगस्ट रोजी मुंबई-कोकणात जुलै-२००५ च्या महाप्रलयाची आठवण करून देणारा पाऊस पडला. मात्र त्यानंतर लगेचच वातावरण बदलले. सततच्या पावसामुळे शहरातील वातावरणामध्ये गारवा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शहरातील तापमानात वाढ झाली आहे. बदललेल्या वातावरणामुळे शहरामध्ये मे महिन्याप्रमाणे रणरणते ऊन पडू लागले आहे. याशिवाय, आद्र्रतेच्या प्रमाणातही वाढ झाल्याने उष्मा वाढला आहे. त्यामुळे आक्टोबर हीटचा त्रास आतापासूनच जाणवू लागला आहे.

१० दिवसांत १ मिमी पाऊस

ठाण्यात ऑगस्ट अखेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. २९ ऑगस्ट रोजी ३१४ मिमी पावसाची नोंद झाली. ३० ऑगस्टला २६ मिमी तर २ सप्टेंबरला ३३ मिमी पावसाची नोंद झाली.  ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत शहरामध्ये पाऊसच पडलेला नसून ९ सप्टेंबरला केवळ १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तापमानाची आकडेवारी..

   दिवस               तापमान (अंश से.)

                     किमान     कमाल

२९ ऑगस्ट     २४            २५.६

३० ऑगस्ट     २४            ३०.२

३१ ऑगस्ट     २५            ३१.२

१ सप्टेंबर      २५.२          ३०.५

२ सप्टेंबर      २५             ३२.६

३ सप्टेंबर      २४             ३०.१

४ सप्टेंबर      २५.२         ३४.००

५ सप्टेंबर      २६            ३३.१

६ सप्टेंबर      २५.१         ३२.५

७ सप्टेंबर      २५             ३४.२

८ सप्टेंबर      २६             ३५.००

९ सप्टेंबर      २५.१          ३३.३

१० सप्टेंबर     २६            ३३.४

First Published on September 12, 2017 2:04 am

Web Title: maximum temperature in 15 days increased by eight degrees celsius in thane