पावसाळय़ाच्या तोंडावर कारवाईची तयारी ; १०० पोलिसांच्या फौजफाटय़ाची मागणी 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी घेतलेल्या जमिनींवरील मोकळ्या जागेत भूमाफियांनी बेकायदा इमारत उभारणीचे सत्र सुरू केले आहे. काही भूमाफिया जागा अडविण्यासाठी सुरुवातीला मोकळ्या जागेवर चाळ बांधतात आणि मग त्या ठिकाणी चाळ तोडून इमारत बांधत असल्याचे ‘एमआयडीसी’ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एमआयडीसी क्षेत्रातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. काही विकासकांना इमारत तोडण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत, अशी माहिती एमआयडीसीतील एका अधिकाऱ्याने दिली.

आजदे, गोळवली, सागाव, सोनारपाडा, चोळे, गजबंधन-पाथर्ली या गावांच्या हद्दीतील गावठाण क्षेत्रात एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहे. या भागातील काही भूखंडांवर उद्योजकांनी कंपन्या सुरू केल्या आहेत. येथील मोकळ्या भूखंडांवर भूमाफियांनी दहशतीचा अवलंब करून एमआयडीसीच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा बहुमजली इमारती बांधल्या आहेत.  ही बांधकामे तोडण्यासाठी जाणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांना माफियांकडून दादागिरी केली जाते.  दोन वर्षांपूर्वी एमआयडीसीतील नाल्यावरील बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना विटांचा मारा करून गंभीर जखमी करण्यात आले होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरही हात उगारण्यात आला होता. त्यामुळे एमआयडीसीने मोठय़ा पोलीस फौजफाटय़ाची मागणी मानपाडा, टिळकनगर पोलिसांकडे केली आहे.

कल्याण, ठाणे, डोंबिवली परिसरात राहणारे एमआयडीसी अधिकारी माफियांकडून दगाफटका नको म्हणून या बेकायदा बांधकामांकडे शक्यतो दुर्लक्ष करतात. फक्त कारवाईच्या नोटिसा पाठवितात आणि नंतर शांत राहतात.  एमआयडीसीला खेटून असलेल्या २७ गावांमध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने सध्या दोन हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. यापूर्वी या भागात सुमारे पाच हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

यामधील ६५० बेकायदा इमारतींची बांधकामे एमएमआरडीएच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने निश्चित केली आहेत. या बेकायदा बांधकामांच्या याद्या एमएमआरडीएने पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रकांकडे दिल्या आहेत तरीही अधिकारी या बेकायदा बांधकामांवर कारवाई न करता माफियांना पाठीशी घालत असल्याचे समजते.

कारवाईचा देखावा

पावसाळ्याच्या तोंडावर कारवाई सुरु करीत मुसळधार पाऊस, कारवाईत अडथळे अशी तकलादू कारणे देऊन तोडकाम बंद केले जाते. गेल्या वर्षी  तोडकामासाठी आणलेली अत्याधुनिक पोकलेन पावसात एमआयडीसी कार्यालयासमोर ताडपत्रीने बांधून ठेवण्यात आली होती. त्यानंतर कारवाई न करताच ती मशीन पाठवून दिली. एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

बेकायदा इमारती

वसंत बाबुराव पाटील यांची सागाव गावठाणातील भूखंड क्र. पी-२८ वरील बहुमजली आर.सी.सी. इमारत. आजदे गावठाणातील भूखंड क्र. ओएस-५ वरील मनोज खंडेलवाल यांची बहुमजली इमारत. मोहन नारायण पाटील, बाळाराम पाटील यांची सागाव गावठाण येथील भूखंड क्र. ए-२८, २९ वरील इमारत. हेमंत दरे, चंद्रकांत साळवे यांची आजदे गावठाण येथील भूखंड क्र. आरएक्स ११ समोरील बेकायदा इमारत. येत्या २५ दिवसांत या इमारती जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने तयार केला आहे. या कारवाईसाठी एमआयडीसीला बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाचे ५० जवान, हत्यारी पोलीस २०, महिला पोलीस २५, पोलीस उपनिरीक्षक १२, पोलीस निरीक्षक आठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चार, पोलीस शिपाई ३० असा १०० पोलिसांचा ताफा हवा आहे.

महापालिका, एमएमआरडीए, एमआयडीसीकडून नियमित आमच्याकडे अतिक्रमणांवर कारवाईसाठी बंदोबस्ताची मागणी करतात. त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना तो उपलब्ध करून दिला जातो. ही नेहमीची प्रक्रिया आहे. एमआयडीसीला त्यांच्या मागणीप्रमाणे बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल.

गजानन कब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे