माजी महापौर गीता जैन निवडणूक लढण्याच्या पवित्र्यात

भाजपच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी महापौर गीता जैन पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहेत. मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात त्या निवडणूक लढविणार असून ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जैन यांनी मात्र याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यास नकार दिला.

मीरा-भाईंदर मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी महापौर गीता जैन यांच्या जबरदस्त चुरस लागली होती. मात्र यात मेहता यांनी बाजी मारली. मंगळवारी भाजपकडून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत मीरा- भाईंदर मतदासंघासाठी मेहतांचे नाव समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे जैन आता बंडखोरी करण्याची तयारी करत आहेत. नरेंद्र मेहता यांना पक्षाचा उमेदवारी अर्ज मिळाला असून ते ४ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहेत.

मेहता  भाईंदर पश्चिम येथील साठ फुटी भागातील कार्यालयातून मिरवणूकीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. जैन या याच साठ फुटी परिसरातून भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे मेहता याच भागातून मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जैन या मीरा रोडच्या एस के स्टोन नाका परिसरातून मिरवणुकीने उमेदवारी दाखल करणार आहेत. यासंदर्भात ग्जैन यांच्याशी संपर्क साधला असता निवडणूक लढविण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसून भूमिका लवकरच जाहीर करू, असा खुलासा केला.

भाजपने २०१४ मध्ये शिवसेनेसोबत पालिकेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पहिल्या महापौर गीता जैन झाल्या. मात्र दीड दोन वर्षांतच त्यांचे आमदार मेहता यांच्याशी बिनसले. त्यातच गीता जैन यांनी मीरा भाईंदर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मानस जाहीर केल्यानंतर हा संघर्ष टोकाला पोहोचला.  गीता जैन यांनी मेहता यांच्या विरोधात राज्यापासून ते थेट दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत तक्रारी केल्या. मेहता यांच्याविरोधात अनेक तक्रारी असूनही ते उमेदवारी अर्ज मिळविण्यात यशस्वी झाले.