मॅरेथॉन मार्ग पाहणीचा दौरा अर्धवट सोडण्याची वेळ; तातडीच्या बैठकीत प्रशासनावर ताशेरे

अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी दुपारी मॅरेथॉन मार्गाचा पाहणी दौरा केला. मात्र, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहून हैराण झालेल्या महापौरांनी दौरा अर्धवट सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिका मुख्यालयात परतताच तातडीने बैठक बोलावून महापौरांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचेही सांगण्यात आले.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोशिएशनच्या माध्यमातून दरवर्षी ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा ही स्पर्धा येत्या १८ ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्व भूमीवर काही दिवसांपूर्वी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी २१ किमी मार्गाचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान इंदिरानगर भागातील मार्ग वगळता उर्वरित संपूर्ण मार्ग खड्डेमुक्त असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांनी पुन्हा स्पर्धेतील १० किमी मार्गाचा पाहणी दौरा आयोजित केला होता. महापालिका मुख्यालयापासून त्यांनी दौऱ्याला सुरुवात करून नितीन कंपनी, तीन हात नाका, तीन पेट्रोल पंप या भागांतील मार्गाची पाहणी केली. त्यामध्ये रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याचे पाहून त्यांनी दौरा अर्धवट सोडला आणि महापालिका मुख्यालयात येऊन अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. येत्या दोन ते तीन दिवसांत मॅरेथॉन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तीन पेट्रोल पंप भागात मलवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदला होता. वाहिनी टाकण्याचे काम झाल्यानंतर खड्डा बुजवून रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम चांगल्या प्रकारे झाले नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत महापौरांनी हे कामही पुन्हा करून घेण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. तसेच खड्डे बुजविल्यानंतर त्या या सर्व मार्गाची पुन्हा पाहणी करणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून भरपावसामध्ये हे खड्डे बुजवणे प्रशासनाला शक्य होत नाही. खड्डे बुजवल्यानंतर या मार्गाचा पुन्हा पाहणी दौरा करण्यात येईल.

– मिनाक्षी शिंदे, महापौर