News Flash

‘ठाण्याचे आयुक्त हुकूमशहा!’

महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात शीतयुद्घ सुरू झाले आहे.

आयुक्त संजीव जयस्वाल व महापौर मीनाक्षी शिंदे

महापौरांचे टीकास्त्र; आयुक्तांचे मात्र ‘नो कॉमेन्टस्’

ठाण्यातील नागरिकांची कामे करण्यासाठी आयुक्तांची नेमणूक करण्यात येते. मात्र, नोकरदार असल्याचे विसरून आयुक्त हुकूमशहाप्रमाणे वागत आहेत, अशी खरमरीत टीका महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. नागरिकांची विकासकामे मार्गी लागावीत म्हणून प्रशासनाकडून होणारा अपमान मी अनेक वेळा गिळला. मात्र, माझा होणारा अपमान हा ठाणेकरांचा अपमान आहे. त्यामुळे यापुढे सभेवर अघोषित बहिष्कार टाकण्यासारखा प्रकार घडला तर ठाणेकरांचा अपमान समजून कायद्याने मला दिलेल्या अधिकाराचा वापर करेन, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, महापौरांच्या टीकास्त्राविषयी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ‘नो कॉमेन्टस’ अशी प्रतिक्रिया दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्तारुंदीकरणांमध्ये बाधीत झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाच्या मुद्दय़ावरून प्रशासनावर टीकेचे आसूड ओढल्यामुळे महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात शीतयुद्घ सुरू झाले आहे. महापौरांनी केलेल्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार टाकला होता.

या घटनेचे तीव्र पडसाद आता महापालिका वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली असून या विषयावर इतके दिवस सौम्य भूमिका घेणाऱ्या महापौर िशदे यांनी बुधवारी आयुक्तांवर थेट निशाणा साधला.

‘ठाण्यातील जनतेची कामे वेगाने व्हावीत यासाठी राग आणि द्वेष बाजूला सारून मी इतके दिवस प्रशासनाला बरोबर घेऊन काम करत होते. वेळप्रसंगी       ठाणेकरांची कामे अडू नयेत म्हणून प्रशासनाकडून होणारा अपमानही निमूटपणे गिळत होते. यामध्ये वैयक्तिक स्वार्थ नव्हता तर ठाणेकरांचे हित होते. असे असताना प्रशासनाकडून माझा सातत्याने अपमान केला जात असून यापुढे तो सहन केला जाणार नाही,’ असे महापौरांनी सांगितले. ठाणे महापालिकेचे सभागृह सर्वोच्च असल्यामुळे आयुक्त बैठक रद्द करूनही सभेला येऊ शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे हा माझा नाहीतर संपूर्ण ठाणेकरांचा अपमान आहे. त्यामुळे आयुक्तांनी आता संपूर्ण ठाणेकरांची

माफी मागावी, असेही त्या म्हणाल्या. प्रशासनाविरोधात भूमिका घेतली तर नगरसेवकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होतात. त्यामुळे या अपमानाविषयी नगरसेवकही भूमिका घेत नसावेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. सर्वसाधारण सभेनंतर आयुक्त जयस्वाल हे महापालिका मुख्यालयात आलेच नाहीत. नागरी संशोधन केंद्र या ठिकाणी बसून ते पालिकेचे कामकाज करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी याविषयी समोर येऊन बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

‘आंदोलनात सहभागी व्हा’

सर्वसाधारण सभेमध्ये अधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार टाकून महापौरांचा अपमान केला म्हणून ठाण्यातील दक्ष नागरिक उन्मेष बागवे यांनी पालिका प्रवेशद्वारावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी उभे राहून आंदोलन केले. त्यामध्ये महापौर आणि ठाणेकर जनतेची आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी दालनात बोलावून उन्मेष बागवे आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांसोबत या आंदोलनाबाबत चर्चा केली. त्यावेळेस या आंदोलनामध्ये एक दिवस सहभागी होण्याचे आवाहन उन्मेष यांनी महापौरांना केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 1:48 am

Web Title: mayor meenakshi shinde says thane commissioner is dictator
Next Stories
1 ‘केडीएमटी’चे खासगीकरण अटळ!
2 मुंबईची कूळकथा : नालासोपाऱ्याच्या नोंदी अडीच हजार वर्षांपूर्वीच्या
3 मतदारांची माहिती फुटली?
Just Now!
X