ठाणे शहरातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपाय योजना जाहीर केल्या जात आहेत. त्यातील ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीसचा अपवाद वगळता एकही प्रकल्प अद्याप मार्गी लागू शकलेला नाही. पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाण पुलांमुळे घोडबंदरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतुकीच्या कोंडीमुळे ठाणेकरांची अडवणूक मागील पानावरून पुढे सुरूच आहे. ठाण्याप्रमाणेच कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्येही कमी-अधिक प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा दररोज सामना करावा लागतो.

बहुप्रतीक्षित विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक, घोडबंदर ते थेट वडाळा अशी धावणारी मेट्रो हे प्रकल्प अद्याप कागदावरच आहेत. डोंबिवली ते कल्याण या दोन शहरांना थेट जोडणारा रस्ता अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. ठाणे असो वा कल्याण या दोन्ही शहरांतून भिवंडीला जाताना नागरिकांना हमखास अडवणुकीला सामोरे जावे लागते. नवी मुंबई, ठाण्यातून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या शीळफाटा चौकातील वाहतूक कोंडी हा सध्या मोठय़ा चिंतेचा विषय आहे. तीच परिस्थिती पत्रीपूल ते कल्याणदरम्यान होते. अवघे दोन किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे अनेकदा अर्धा अर्धा तास लागतो. अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते, अरुंद चौक आणि वाढती वाहनसंख्या हे ठाणे परिसरातील वाहतूक अनवस्थेचे त्रांगडे आहे. ठाण्यासह इतर सर्वच शहरांमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अत्यंत अपुरी आणि बेभरवशाची आहे. ठाणे आणि कल्याण या दोन महापालिका क्षेत्रांत असलेली परिवहन व्यवस्था असून नसल्यासारखीच आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रिक्षांची संख्या अतिशय कमी आहे. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये परिवहन व्यवस्थाच नाही. शहरांमधील ही अंतर्गत वाहतूक व्यवस्था प्राधान्याने सुधारण्याऐवजी राज्यकर्ते सध्या ठाणे-बोरिवली या अतिमहत्त्वाकांक्षी भुयारी मार्गाचे स्वप्न दाखविण्यात धन्यता मानत आहेत. खरे तर नेहमी अडवणूक करणाऱ्या चौकांमध्ये असे छोटे भुयारी मार्ग केल्यास वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह सहज भेदता येऊ शकते. ठाण्यातील तीन हात नाका, नितीन कंपनी, कल्याणचा शिवाजी चौक आदी ठिकाणी अशा भुयारी मार्गाची अथवा पादचारी पुलांची नितांत आवश्यकता आहे. स्मार्ट सिटींच्या पंक्तीत बसलेल्या या शहरांची ही साधी गरज शासन आणि प्रशासनाने पूर्ण करावी, अशी येथील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे.

अतिक्रमणांच्या घशात चौक

प्रत्येक शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी चौकांची संकल्पना राबवण्यात येत असून रस्त्यावरील वाहतूक वेगवेगळ्या दिशांनी वळवण्यासाठी चौकाचा महत्त्वाची भूमिका असते. चौकांच्या मधोमध वाहतूक बेट निर्माण करून चारही दिशांना वर्तुळाकार वाहतूक करता येईल अशी व्यवस्था चौकांमध्ये केली जाते. मात्र डोंबिवली शहरातील रस्ते इतके अरुंद आहेत की या भागात चौक ही संकल्पनाच दिसून येत नाही. नव्याने होणाऱ्या रस्त्यांवर वेगवेगळे चौक होत असले तरी रेल्वे स्थानक परिसरामध्ये चार रस्ते जोडणाऱ्या चौकांची संख्या एखाद्दुसरी इतकीच आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून शहराच्या अन्य भागांमध्ये जाणारे रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, फेरीवाले, रिक्षा थांबे, बस थांबे यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसते. पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झालेल्या या शहरात चौकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. शिवाय शहरातील चौकसुद्धा अतिक्रमणांच्या विळख्यात जाऊ लागल्याने वाहन चालकांच्या अडचणीत अधिकच वाढ होऊ लागली आहे. सध्या अस्तित्वात असलेली सगळी चौक अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्यातून मार्ग काढण्याचा कोणताही प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून होत नाही. वाहतूक पोलिसांकडून वाहनांची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी अतिक्रमणांमुळे कोंडीचा फटका सहन करावा लागतो. डोंबिवली स्थानकातून रिक्षाने मानपाडा, घरडा परिसरामध्ये जाण्यासाठी अर्धा तासाहून अधिक वेळ लागतो. डोंबिवली शहरामध्ये नव्याने तयार झालेले चौकही वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील चौक : ‘मौत का कुवा’

कल्याण-डोंबिवली शहरातील वाढलेली वाहने आणि अतिक्रमणामुळे अरुंद झालेले रस्ते हे शहराच्या कोंडीची मुख्य कारणे बनली असून चौकांमध्ये एकावेळी चार वेगवेगळ्या मार्गाने येणारी वाहने रस्ते पूर्णपणे बंद करतात. त्यामुळे या भागातून वाहने चालवणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे बनले आहे. तर पादचाऱ्यांना अशा रस्त्यावरून चालताना सर्कशीतल्या ‘मौत का कुवा’ हा खेळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चौकाच्या मध्यभागी उभा पादचारी आणि चारही बाजूने भर वेगामध्ये धावणारी वाहने म्हणजे कोणत्याही क्षणी मृत्यूची गळाभेट असा थरारक अनुभव येथील नागरिकांना दररोज येतो.

शिवाजी चौक, कल्याण

कल्याण शहरातील महत्त्वाचा चौक असलेला शिवाजी चौक हा महापालिकेपासून अवघ्या शंभर मीटरच्या अंतरावर आहे. महापालिकेच्या कामकाजामध्ये भाग घेण्यासाठी आणि शहर नियोजनाची जबाबदारी नागरिकांनी सोपवली असलेले महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्तांसह प्रशासनातील अधिकारीवर्ग याच मार्गाने महापालिकेमध्ये प्रवेश करतो. अनेक वेळा या चौकातील वाहतूक कोंडीचा सामना या मंडळींना करावा लागत असला तरी ही कोंडी दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पाची आखणी या मंडळींना चर्चेससुद्धा आणलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची अवस्था खूपच बिकट ठरली आहे. शिवाजी चौकामध्ये मुरबाड रोड, रेल्वे स्थानकाकडून येणारी वाहतूक, डोंबिवलीकडील वाहतूक, पारनाक्याकडून होणारी वाहतूक आणि भिवंडीकडून येणारी वाहतूक अशा चारही दिशांनी येणारी वाहतूक एकत्र येते. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी दिवसाच्या कोणत्याही वेळी आढळून येते. अपघाताचे प्रसंग तर इथे नित्याचे आहेत त्यामुळे यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोंडीची जंक्शने

मुरबाड रोडवरील सुभाष चौक, सिंडिकेट, रामबाग या भागातील वेगवेगळी चौक वाहतूक कोंडीत सापडली आहेत. या शिवाय कल्याण पूर्वेतील चक्की नाका, काटेमानवली नाका,

तिसगाव नाका, सम्राट अशोक नगर परिसरातील चौकांमध्येही मोठी वाहतूक कोंडी होऊन पुना लिंक रोडवरील वाहतूक खोळंबा निर्माण होतो. या भागातही अनेक वेळा तासन्तासभर वाहनचालकांना खोळंबून रहावे लागते. अवजड वाहनांच्या गर्दीचाही या भागात मोठा फटका बसतो. मुरबाड रोड, आग्रा रोड आणि पुना लिंक रोडवरही अवजड वाहनांचा फटका वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागतो.

दुर्गाडी चौक, कल्याण

कल्याण-भिवंडी शहराला जोडणारा अरुंद दुर्गाडी पुल ही या भागातील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे. दोन्ही बाजूला मोठे रस्ते आणि त्या तुलनेत अरुंद पुल शिवाय पुलावरील खड्डे यामुळे भिवंडीकडील भागात व कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चौकात वाहतूक कोंडी साचते. आग्रा रस्त्यावरील या चौकात वाहनांची मोठी वर्दळ असून भिवंडीकडे जाणारा अरुंद रस्ता हा येथील कोंडीचे मुख्य कारण ठरत आहे.

महात्मा फुले चौक, मुरबाड रोड

मुरबाड रोडवरील महात्मा फुले चौक अनधिकृत वाहनांच्या पाìकगमुळे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. मुरबाड परिसरात होणाऱ्या जीप गाडय़ांची गर्दी या भागात असून त्यामुळे रुक्मीणीबाई रुग्णालयात जाणे सुद्धा अवघड बनले आहे. शिवाय कचरा आणि भिकारी गर्दुल्ल्यांचा सामना या भागात वाहन चालकांना करावा लागतो.

नवे प्रकल्प हवेत..

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात येत असून अशा प्रकल्पांची गरज कल्याण शहराला भासत आहे. शिवाजी चौकातील कोंडी सोडवण्यासाठी उन्नत आग्रा रोडची संकल्पना पुढे आली होती. पत्रीपुलावरून पुढे येणारी वाहतूक उन्नत मार्गाने थेट दुर्गाडी जवळ उतरल्यास आग्रा रस्त्यावरील वाहतुकीचा भार काही अंशी कमी होऊ शकणार होता. मात्र ही संकल्पना राबवण्यासाठी कोणतीच हालचाल झाली नसल्याने हा प्रकल्प केवळ चर्चेच्या पातळीवर राहिला. रस्ता ओलांडण्यासाठी सब-वे, पादचारी पुलांची गरज निर्माण झाली आहे. शिवाजी चौकातील एकूण परिस्थिती पाहता या भागातील रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांना सब-वे आणि पादचारी पुलांची गरज निर्माण झाली असून त्यामुळे या भागातील वाहतुकीचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

लाल चौकी, कल्याण

जुन्या कल्याणातील हा महत्त्वाचा चौक असून पारनाक्याकडून येणारी वाहने, त्याचबरोबर फडके मैदानाकडून येणारी वाहने आग्रा रोडवरील या चौकात एकत्र येत असून त्याचा फटका आग्रा रस्त्यावरील वाहतुकीला होतो. रिक्षा थांब्याची गर्दी इथे असून रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी गर्दी इथे आढळते. त्याशिवाय शारदा विद्यामंदिर सारखी शाळा इथे असल्याने विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फटका या चौकात वाहतुकीला होतो.

सहजानंद चौक, कल्याण

आग्रा रस्त्यावरील सहजानंद चौकातही शिवाजी चौकाप्रमाणेच वाहतूक कोंडीची परिस्थिती असून शिवाजी चौकातील कोंडी वाढून सहजानंद चौकातही कोंडी निर्माण होते. हे दोन्ही चौक अवघ्या काही अंतरावर असल्याने वाहतूक खोळंब्याचा फटका या दोन्ही चौकांना सारखाचा बसतो. संतोषी माता रस्त्यावरून येणारी वाहतूक, काळातलावाकडून येणारी वाहने आणि जुन्या कल्याणातून येणारी वाहने वाढल्याने हा चौक कोंडीच्या विळख्यात जातो. रस्त्यावरील अतिक्रमणे, फेरीवाल्यांच्या गाडय़ा, पाìकग केलेली वाहने ही या भागातील वाहतूक कोंडीची मुख्य कारणे ठरत आहेत.

घरडा सर्कल डोंबिवली..

डोंबिवलीतील घरडा सर्कल हा अवघ्या काही वर्षांपूर्वी नव्याने तयार झालेला चौक असून शहरातील अन्य भागांतील गर्दीपेक्षा काही अंशी सुटसुटीत असा हा परिसर आहे. मात्र वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे हा भाग गर्दीच्या काळात वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडतो. कल्याणकडून येणारी वाहतूक, मानपाडा रोडवरील वाहने, पेंढकर महाविद्यालयाकडील वाहतूक सगळी या भागात एकत्र येऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. शिवाय नवी मुंबईतील कंपन्यांच्या येणाऱ्या गाडय़ाही वाहतूक कोंडीला निमंत्रण देत असतात.
  – संकलन – श्रीकांत सावंत