भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील ८०टक्के खाटा आरक्षित न ठेवता रुग्णांकडून  भरमसाठ देयक वसूल करणाऱ्या मीरा रोड येथील गॅलेक्सी रुग्णालयाची कोविड रुग्णालय  म्हणून दिलेली मान्यता मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने रद्द केली. त्याचप्रमाणे आतापर्यंत रुग्णांकडून जादा आकारणी केलेली रक्कम या खासगी रुग्णालयाकडून वसूल करण्याचे  आदेशही पालिका आयुक्त  डॉ. विजय राठोड यांच्याकडून देण्यत आले आहेत.

मीरा-भाईंदर शहरात प्रथमच कोरोनाग्रस्तांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या एका खाजगी रुग्णालयाला प्रशासनाने दणका दिला आहे. महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात  कोविड-१९ अंतर्गत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ८० टक्के खाटा राखीव ठेवून शासनाने दिलेल्या दरानुसार कोविड रुग्णांना देयक आकारणी करणे आवश्यक केले होते. या रुग्णालयाने शासनाच्या आदेशाचे पालन न करता अवाजवी देयके आकारत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने पालिका प्रशासनाने नोटीस बजावून रुग्णालयास शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कामकाज न करणेबाबत खुलासा सादर करण्यास सांगितले. याबाबत गॅलेक्सी रुग्णालयाकडून कोणताही खुलासा प्राप्त झाला नाही.