फेरीवालामुक्त शहरासाठी पालिका आयुक्तांची घोषणा; ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात नागरी समस्यांवर चर्चा

भाईंदर : बेकायदा फेरीवाले, अनधिकृत वाहनतळ, बेशिस्त वाहतूक, शहर नियोजनाचा अभाव आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही मीरा-भाईंदर शहराची ओळख झाली आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी पालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्र येऊन शहरातील नागरी समस्यांवर तोडगा काढण्याची गरज असल्याची आणि त्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचे असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली.

मीरा-भाईंदर महापालिकेने फलकमुक्त शहर अभियानाची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर आता फेरीवालामुक्त मीरा भाईंदरची संकल्पना आखली आहे. येत्या काही महिन्यांत रस्त्यावरील फेरीवाल्यांना सामावून घेण्यासाठी ठिकठिकाणी मंडईची निर्मिती केली जाईल. याशिवाय शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळे उभारणीच्या दिशेने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मीरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी दिली.

नागरी समस्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी भाईंदर पश्चिमेकडील नगरभवन येथे शनिवारी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालिका आणि वाहतूक पोलिसांनी कोणती भूमिका बजावणे गरजेचे आहे, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी पालिका आयुक्तांनी भूमिका मांडली. अनेक नागरी प्रश्नांना या कार्यक्रमात वाचा फोडण्यात आली.

मीरा-भाईंदर शहरात अशा पद्धतीचा पहिलाच कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मीरा-भाईंदरमधील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. नगरभवन येथील सभागृह तुडुंब भरले होते. काही जणांना आसने न मिळाल्याने उभे राहूनच कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी नागरिकांनी केवळ समस्याच नव्हे, तर शहर नियोजनासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल सूचना मांडल्या. हे बदल घडवून आणण्यासाठी पालिका आणि वाहतूक पोलिसांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे, यावर नागरिकांनी मते मांडली.

जनवादी हॉकर्स सभेचे अ‍ॅड. किशोर सामंत, आझाद हॉकर्सचे युनियनचे जय सिंग, सामाजिक कार्यकर्ते मीलन म्हात्रे यांनी शहरातील फेरीवाल्यांचे योग्य धोरण ठरवून त्यांना न्याय मिळावा आणि शहराचे शिस्तबद्ध नियोजन करावे, अशी भूमिका मांडली, तर नागरिक प्रतिनिधी विजय पाटील यांनीही शहरात मोठय़ा प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काय करावे लागेल, याविषयीच्या सूचना उपस्थितांसमोर ठेवल्या. यावर प्रशासनाच्या वतीने पालिका आयुक्त बालाजी खतगांवकर, पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी या चर्चासत्रात सहभाग घेऊन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. चर्चेअंती पालिका आयुक्तांनी शहरातील फेरीवाल्यांचे नियोजन करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. फेरीवाला सर्वेक्षण पूर्ण झाले की त्याला मान्यता घेऊन फेरीवाल्यांसाठी मंडई तयार करून त्यात त्यांना स्थलांतर केले जाईल, असे सांगितले. वाहनतळांची निर्मिती करून रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या गाडय़ांसाठी जागा उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.