अपुऱ्या संख्याबळामुळे सभा रद्द

भाईंदर :  मीरा भाईंदर महानगरपालिकेची गुरुवारी विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती; परंतु महासभेला केवळ २२ नगरसेवक उपस्थित असल्यामुळे संख्याबळअभावी सभा रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी भाजप पक्षातील नगरसेवक पक्षांतर्गत आढावा बैठकीस उपस्थित असतानादेखील महासभेला उपस्थित नव्हते, तर इतर पक्षांतील नगरसेवकांनी ऑनलाइन महासभेला पाठा फिरवली असल्याचे दिसून आले आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेची विशेष महासभा १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिकेमार्फत दुसऱ्यांदा ऑनलाइन महासभेचे आयोजन ‘झूम’ या समाजमाध्यम अ‍ॅपद्वारे करण्यात आले होते. या महासभेत कर सवलत आणि कोविडकाळात करण्यात आलेल्या उपाययोजनेचा आढावा घेण्यात येणार होता; परंतु सभेला नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सभा रद्द करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी घेतला. महानगरपालिकेत एकूण ९५ नगरसेवक आहेत. महासभा पार पाडण्याकरिता कायद्यानुसार ५० टक्के म्हणजे किमान ४८ नगरसेवक उपस्थित असणे बंधनकारक असते; परंतु  केवळ २२ नगरसेवक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यात भाजपचे केवळ ४, शिवसेना ११, तर काँग्रेस ७  असे पक्षातील नगरसेवक उपस्थित होते. भाजप पक्षातील अंतर्गत वादामुळे नगरसेवक उपस्थित नसल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहेत.

पक्षातील नगरसेवक का उपस्थित राहिले नाही याची सखोल चौकशी मी करणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत महासभेचे आयोजन करण्यात येईल.

– ज्योत्स्ना हसनाळे, महापौर, मीरा भाईंदर महानगरपालिका