मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या चित्रीकरण शुल्कवाढीचा परिणाम

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी करण्यात येत असलेल्या चित्रीकरणाच्या दरात वाढ केल्याने चित्रीकरणासाठी परवानगी न घेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नुकत्याच दोन बेकायदा चित्रीकरणावर केलेल्या लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाईनंतर हे स्पष्ट झाले आहे. शिवाय वाढलेल्या दरांमुळे निर्माते चित्रीकरणासाठी मीरा-भाईंदरऐवजी अन्य ठिकाणांना पसंती देऊ लागले असून याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

छोटय़ा पडद्यावरील मालिका आणि ‘रिअ‍ॅलिटी शो’ची अशा अनेक कार्यक्रमांचे चित्रीकरण मीरा-भाईंदर शहरात पार पडत आहे. बहुतांश वेळा हे चित्रीकरण बंदिस्त स्टुडिओमधून केले जात असले तरी कथेच्या आवश्यकतेनुसार अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणीदेखील चित्रीकरण केले जाते.  परंतु काही चित्रीकरणांचा नागरिकांना त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे येऊ लागल्याने  चित्रीकरणांवर काही निर्बंध लादत चित्रीकरण शुल्कातही महासभेने वाढ केली.

या शुल्कवाढीमुळे अनेक निर्माते पालिकेची परवानगी न घेताच चित्रीकरण करू लागल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. आतापर्यंत दोन विनापरवानगी चित्रीकरणांवर ५ लाख आणि ११ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेने केलेल्या चित्रीकरणाच्या शुल्कवाढीवर निर्माते नाराज आहेत. त्यामुळेच सातत्याने चित्रीकरणासाठी नवीन ठिकाणांच्या शोधात असलेले निर्माते, दिग्दर्शक आता मीरा-भाईंदरऐवजी खाडी पलीकडे नायगाव, वसई, भिवंडी रोड या ठिकाणी चित्रीकरण करू लागले असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली.

शुल्कवाढ

चित्रीकरणासाठी आकारले जाणारे १५ हजार हे शुल्क थेट ५० हजार रुपयांवर नेण्यात आले. शिवाय एक एकरपेक्षा कमी क्षेत्रफळाची मैदाने आणि उद्यानासाठी ५० हजार आणि एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या मैदान आणि उद्यानासाठी १ लाख रुपये भाडे आकारण्याचा निर्णय महासभेने घेतला.विनापरवानगी  चित्रीकरण करणाऱ्यांवर शुल्काच्या दहापट दंड वसूल करण्याची कारवाई करण्याचा निर्णयदेखील या वेळी घेण्यात आला.

‘मुंबईच्या तुलनेने महाग’

महापलिका सध्या आकारत असलेले शुल्क मुंबई महानगरपालिकेच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे असे मालिका निर्मात्यांचे म्हणणे आहे. मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रस्त्यावर अथवा मैदानावर चित्रीकरणासाठी केवळ १० हजार रुपये शुल्क आकारते. चित्रीकरणासाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रनगरीतही सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरणासाठी २० हजार रुपये आणि मराठी मालिका, चित्रपटासाठी १० हजार रुपये शुल्क आकारले जाते अशी माहिती मालिकांच्या निर्मिती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या एका व्यवस्थापकाने दिली.