केवळ एकाच नगरसेवकाचा प्रस्ताव महासभेपुढे
अनधिकृत बांधकाम प्रकरणात नगरसेवकांचे पद रद्द करण्याबाबत तीन नगरसेवकांविरोधात न्यायालयात जाण्यासाठी प्रशासनाकडून महासभेकडे परवानगी मागण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात भाजपसह आणखी एका नगरसेवकास तूर्तास अभय देत महापौरांनी केवळ काँग्रेसचे जुबेर इनामदार यांचाच प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या विशेष महासभेपुढे आणला आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून महासभेत याचे तीव्र पडसाद उमटणार असल्याचे संकेत आहेत.
अनधिकृत बांधकामाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कारणीभूत असल्याबद्दल मीरा-भाईंदर महापालिकेच्या पाचपैकी तीन नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची परवानगी प्रशासनाने महासभेकडे मागितली होती. मात्र भाजपचे यशवंत कांगणे व काँग्रेसचे दुसरे नगरसेवक हंसुकुमार पांडे यांचे प्रस्ताव बाजूला ठेवून महापौर गीता जैन यांनी फक्त काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांचाच प्रस्ताव स्वीकारला आहे. मंगळवारी होणाऱ्या विशेष महासभेत जुबेर यांचे प्रकरण न्यायालयापुढे पाठवायचे की नाही यावर निर्णय होणार आहे. मात्र कांगणे व पांडे यांचे प्रस्ताव या महासभेपुढे न घेण्याचा महापौरांच्या निर्णयाबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लियाकत शेख व त्याची नगरसेविका पत्नी शबनम शेख, काँग्रेसचे हंसुकुमार पांडे व गटनेते जुबेर इनामदार तसेच भाजपचे यशवंत कांगणे यांच्या अनधिकृत बांधकामाच्या सहभागाबाबात आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे तक्रारी करण्यात येऊन त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. आयुक्तांनी या प्रकरणी सर्वाची सुनावणी घेतली. लियाकत शेख व शबनम शेख यांचे बांधकाम उत्तन या एमएमआरडीच्या अखत्यारीतील क्षेत्रात येत असल्याने आयुक्तांनी या दोघांचे प्रस्ताव सद्यस्थितीत बाजूला ठेवले आहेत. मात्र जुबेर इनामदार, यशवंत कांगणे व हंसुकुमार पांडे यांच्याबाबत निर्णय घेताना या तीनही प्रकरणात संदिग्धता निर्माण होत असल्याने तिघांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. परंतु यासाठी महासभेची परवानगी लागत असल्याने आयुक्तांनी याबाबत महासभेकडे परवानगी मागितली. परंतु महापौर गीता जैन यांनी केवळ जुबेर इनामदार यांचाच प्रस्ताव महासभेपुढे घेतला. यशवंत कांगणे व हंसुकुमार पांडे यांचे प्रस्ताव महासभेपुढे न घेता महापौरांनी त्यांच्यावर विशेष मेहेरनजर दाखविल्याने राजकीय वतुर्ळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

तांत्रिक अडचण
प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आले असतानाही भाजपचे यशवंत कांगणे व काँग्रेसचे हंसुकुमार पांडे यांचे प्रस्ताव महापौरांनी महासभेत घेतले नाहीत. परंतु नियमानुसार प्रशासनाने एखादा प्रस्ताव महापौरांकडे दिला आणि नव्वद दिवसांच्या आत तो महासभेपुढे आला नाही तर आपोआपच स्वीकारला आहे, असे समजून आयुक्तांना पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळेच महापौरांच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महासभेपुढे कोणता प्रस्ताव घ्यायचा याचा संपूर्ण अधिकार महापौरांचा आहे. जुबेर इनामदार यांच्याबाबतचे सविस्तर तपशील आल्याने त्यांचा प्रस्ताव महासभेपुढे घेण्यात आला आहे. उर्वरित नगरसेवकांच्या प्रस्तावाबाबत पूर्ण तपशील आल्यानंतर त्यांचे प्रस्ताव महासभेपुढे घेण्यात येतील.
-गीता जैन, महापौर

विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांविरोधात खंबीरपणे काम करत असल्यानेच केवळ आपला प्रस्ताव महासभेपुढे आणण्याचे राजकारण खेळले गेले आहे.
-जुबेर इनामदार