१३५ बांधकामांना नोटीस; तोडक कारवाईस सुरुवात

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराला काळिमा लागलेल्या अनधिकृत बार आणि लाँजिगवर तोडक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तर या संदर्भात १३५ बार आणि लाँजिगला नोटीस पाठवण्यात आली असून दररोज कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.

करोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदी नियमाचा फायदा शहरातील अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये अधिक तर लॉजिंग-बोर्डिगचा समावेश आहे. महापालिकेच्या हद्दतील दिल्ली दरबार उपाहारगृहापासून दहिसर चेक नाका व मीरा-भाईंदर रोड  या परिसरात मोठय़ा प्रमाणावर लॉजिंग-बोर्डिग व लेडीज बार आहेत. येथील लॉजमध्ये अनधिकृतपणे छुप्या खोल्या बांधण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्य शासनाने उपाहारगृह सुरू करण्यासाठी परवानगीदेखील दिली आहे. त्यामुळे शहरातील लॉजिंग-बोर्डिगमध्ये तयार करण्यात अनधिकृत खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार पुन्हा सुरू होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या हॉटेल्सची यादी तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. महापालिकेमार्फत शहरातील १३५ उपाहारगृहांना नोटीसदेखील बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रकारे नगररचना विभागामार्फत हॉटेलच्या आराखडय़ाची माहिती घेऊन आणि अग्निशमन दलाची परवानगी तपासून कारवाई सुरू असल्याचे पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.

गोल्डन पॅलेसवर तोडक कारवाई

मीरा रोड येथील हाटकेश परिसरात औद्योगिक वसाहतीत गोल्डन पॅलेस नावाने ओयोचे लाँजिग-बोर्डिग अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देखील कारवाई करण्यात येत नसल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांना प्राप्त झाली. त्यानुसार  मंगळवारी उपायुक्त अजित मुठे, अतिक्रमण अधिकारी नरेंद्र चव्हाण आणि प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम यांच्या उपस्थितीत एकूण २० खोल्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्याला दिले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रभाग समिती प्रमाणे ऑर्केस्ट्रा  बार आणि लॉजिंगची संख्या

प्र समिती क्र   लॉजिंग  ऑर्केस्ट्रा 

०१                      १९       ००

०२                     ००       ००

०३                     ०७        ०६

०४                      २६       ०२

०५                      ०८       ०१

०६                     ४५        २१

एकूण                १०५      ३०