भाईंदर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शहरातील वृक्ष छाटणी पूर्ण झाली नाही आहे. त्यामुळे अनेक भागात रात्रीच्या सुमारास पथदिव्याचा प्रकाश अडवला जात असून अंधार होत असल्यामुळे  नागरिक त्रस्थ झाले आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या उद्यान विभागांकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी  झाडांची छाटणी करणे, धोकादायक झाडे तोडणे, नवीन झाडे लावणे , झाडांची सुरक्षा व्यवस्था पाहणे अशी अनेक कामे  केली जातात. पावसाळ्यापूर्वी मोठमोठय़ा व रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली जाते. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शहरातील अनेक भागात वृक्ष छाटणी झाली नसल्याचे दिसून येते आहे.अशा परिस्थितीत  शहरात काही ठिकाणी  रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे हवेमुळे उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाकल्याने झाडे धोकादायक अवस्थेत आली आहेत.

भाईंदर पूर्व परिसरातील नवघर आणि शिर्डी नगर परिसरात झाडांची छाटणी न झाल्यामुळे झाडे मोठय़ा प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे पथदिव्यांच्या मध्ये झाडांच्या फमंद्या येत असून  रात्रीच्या सुमारास परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे लहान मुलं आणि महिला रस्त्यावर फिरण्यास घाबरत आहेत. म्हणून लवकरच या भागातील झाडांची छाटणी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

या संदर्भात मी पालिकेला पत्रदेखील लिहिले आहे. परंतु अद्यापही त्यावर काम करण्यात आले नसून कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

– अनिल रानवडे, मनसे, शहर संघटक

वृक्ष छाटणीचे काम अनेक भागात शिल्लक राहिले होते, ते पूर्ण करण्यात येत आहे.

– हंसराज मेश्राम, उद्यान निरीक्षक