गुंडांची दहशत मोडून काढण्याचा पोलिसांचा निर्धार

पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गुंड टोळ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. नालासोपाऱ्यातील बिडलान टोळीच्या चार गुंडांवर मोक्का दाखल करण्यात आला असून आतापर्यंत जिल्ह्यात ३० जणांवर मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १८ जणांना अटक करण्यात आली असून १२ बेपत्ता गुंडांचा शोध सुरू आहे.

अंडरवर्ल्ड टोळ्या थंडावल्या असल्या तरी वसई-विरार शहरात छोटय़ा गुंड टोळ्यांनी हैदोस घातला होता. आपापल्या परिसरात गुन्हेगारी कारवाया करून ते दहशत निर्माण करत आहेत. पालघर पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून या गुंड टोळ्यांचा बिमोड करण्याचा आदेश दिला. पालघर स्थानिक गुन्हे शाखा त्यानुसार कामाला लागली आणि एकामागोमाग एक गुंड टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत एकूण ३० गुंडांवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांपैकी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे, गोळीबार करणे, लूटमार, धमकावणे आदी  आरोप आहेत. याशिवाय दरोडा घालणाऱ्या टोळीच्या गुंडांवरदेखील मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.