सामाजिक अंतराचा नियम पाळत नसल्याने महापालिकेचा नवा आदेश

ठाणे : मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील चिकन आणि मटण दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करत महापालिका प्रशासनाने ही दुकाने आठवडय़ातून चार दिवस बंद ठेवण्याबरोबरच त्यांच्या वेळा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, नव्या निर्णयानुसार ही दुकाने आता बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहणार आहेत.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे ठाणे महापालिकेचा संपूर्ण परिसर गेल्या काही महिन्यांपासून बंद होता. या काळात जीवनाश्यक वस्तू, दूध, भाजीपाला आणि औषधालये सुरू होती, तर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये या सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. असे असतानाच केंद्र आणि राज्य शासनाने जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात टाळेबंदी शिथिल केली. त्यानंतर ठाणे महापालिकेने सम-विषम पद्धतीने सर्वच दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानांमध्ये सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे आदेशही दिले आहेत. परंतु मुंब्य्रातील चिकन आणि मटण दुकानांमध्ये ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत असून या ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्याआधारे ही दुकाने आठवडय़ातून तीनच दिवस आणि ठरावीक वेळेत खुली ठेवण्याचा निर्णय महापालिका उपायुक्त महेश आहेर यांनी घेतला.

या दिवशी दुकाने सुरू

बुधवार, शुक्रवार, रविवार

(वेळ : सकाळी ८ ते दुपारी १)