वरिष्ठ अधिकारांच्या हस्ते उद्घाटनाच्या हट्टापोटी बंद
रेल्वे अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळावी यासाठी कल्याणमध्ये उभारण्यात आलेले ‘वैद्यकीय कक्ष’ महाप्रबंधकांच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या हट्टापायी बंद अवस्थेत आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये दादर आणि ठाणे स्थानकांपाठोपाठ कल्याण स्थानकात होणाऱ्या या कक्षाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयाशी हे कक्ष चालवण्यासाठी करारही करण्यात आला आहे. मात्र उद्घाटनासाठी महाप्रबंधक उपलब्ध होत नसल्याने हे केंद्र बंद आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांनी याविरूध्द आक्षेप नोंदवला आहे.
ठाण्यापलिकडच्या स्थानकातील वाढलेल्या गर्दीमुळे अपघाताचे प्रसंग नित्याचे बनले असून अनेकदा प्रवाशांना प्राथमिक उपचार मिळत नसल्याने प्राण गमवावे लागतात. त्यामुळे महत्वाच्या स्थानकांमध्ये किमान वैद्यकिय सुविधा पुरवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली होती. याविषयी न्यायालयीन लढाई करण्यात आली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये वैद्यकिय सुविधा देणाऱ्या कक्षाची उभारणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर दादर स्थानकामध्ये पहिले वैद्यकिय कक्ष उभे राहिले. त्यानंतर दोन ते तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दुसरे वैद्यकिय कक्ष उभारण्यात आले आहे. ठाण्यापलिकडच्या स्थानकात होणाऱ्या अपघातग्रस्तांना या केंद्रामध्ये उपचार दिले जातात. ठाण्यानंतर अशा प्रकारचे वैद्यकिय केंद्र कल्याण रेल्वे स्थानक परिसरात उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील बाजुच्या पार्सल कार्यालयाच्या बाजुला हे केंद्र तयार करण्यात आला आहे. त्यासाठी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयाशी करार करण्यात आला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस हे कक्ष सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र जानेवारी महिना उलटून फेब्रुवारी महिन्याची अखेर आली तरी कक्ष सुरू होत नसल्याने अखेर प्रवासी संघटनांमध्ये असंतोष सुरू आहे. या कक्षाचे उद्घाटन करण्यासाठी महाप्रबंधकांना बोलवण्यात येणार आहे. मात्र महाप्रबंधकांना वेळ नसल्याने हे उद्घाटन रखडल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याण स्थानकातील वैद्यकिय कक्षाचे काम अद्याप सुरू असून काम पुर्ण झाल्यानंतर महाप्रबंधकांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन होईल. रुग्णालयाशी कराराची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
– प्रदीपकुमार दास, कल्याण स्थानक व्यवस्थापक