भाईंदर : टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगार आणि मजूर यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याकरिता शासनातर्फे व्यवस्था केली जात असताना त्याकरिता  वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे करण्यात आले आहे. परंतु या वैद्यकीय प्रमाणपत्राकरिता भली मोठी रांग लागत असल्यामुळे अनेक खाजगी डॉक्टर चक्क तपासणी न करता प्रमाणपत्र देत असल्याचे आढळून आले आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ताळेबंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरात अडकून पडलेल्या मजुरांना गावाकडे जाण्याची घाई लागली आहे. अशा मजुरांकरिता केंद्र सरकारकडून परत पाठवण्याकरिता गाडय़ांची सोय करून त्याकरिता एक फॉर्म प्रसारित करण्यात आला आहेत. या फॉर्मसोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले आहे. हे प्रमाणपत्र शासकीय अथवा खाजगी डॉक्टरकडून घेण्यासदेखील परवानगी देण्यात आली आहे.

भाईंदर पूर्व परिसरात मोठय़ा प्रमाणात औद्योगिक वसाहती असून सुमारे ३० हजार मजूर तेथे वास्तव करत आहेत. केंद्र सरकारकडून गावी जाण्याकरिता सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे ते मिळेल त्या खाजगी डॉक्टरांकडे तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी रांग लावत आहेत. असाच एक प्रकार भाईंदर पूर्व परिसरातील विमल डेअरीजवळ असलेल्या दवाखान्यात दिसून आला. सकाळी दवाखान्याबाहेर प्रचंड गर्दी झाल्यामुळे डॉक्टर राजेश गुप्ता यांनी अनेक मजुरांकडून १५० रुपये फी आकारून प्रमाणपत्र वाटप केले, परंतु तपासणीच केली नाही. या निष्काळजीपणामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची तपासणी करण्यात येईल. अशा प्रकारचे कृत्य निदर्शनास आल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

– आयुक्त चंद्रकांत डांगे,आयुक्त (मीरा-भाईंदर)