नागरी आरोग्य केंद्राबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन

भगवान मंडलिक, लोकसत्ता 

कल्याण : राज्याबाहेरील आपल्या गावी जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या परप्रातीयांना कल्याण-डोंबिवली पालिकेच्या १० प्रभाग कार्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश आपण वैद्यकीय आरोग्य विभागाला दिले आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

टाळेबंदीमुळे गेल्या दीड महिन्यापासून  पालिका हद्दीत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील हजारो कामगार अडकून पडले आहेत.  पालिका हद्दीतील कंपन्या, अनेक व्यवसायात हे कामगार काम करतात. केंद्र, राज्य शासनाने या कामगारांना  त्यांच्या प्रांतात पोहचविण्याचा निर्णय पाच दिवसांपूर्वी घेतला. अशा कामगारांनी स्थानिक पोलीस ठाण्यात विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यायचा आहे.  सोबत कामगारांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपणास करोनाचा संसर्ग झालेला नाही. आपणास ताप, सर्दी, खोकला नाही अशा आशयाचे साक्षांकित वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायचे आहे. त्यासाठी  टिटवाळा ते कल्याण, डोंबिवलीतील १५ आरोग्य केंद्रांच्या बाहेर वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कामगारांनी गर्दी केली आहे. या केंद्रांच्या बाहेर एक ते दोन किमीच्या रांगा लागत असतात.  ही गर्दी आमच्या भागात संसर्गाची परिस्थिती निर्माण करीत आहेत, अशा तक्रारी परिसरातील नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. ‘पालिका नागरी आरोग्य केंद्रांमध्ये करोना साथ नियंत्रणासाठी  दवाखाने सुरू केले आहेत. तेथे अशा प्रकारचे रुग्ण येत असताना पुन्हा त्याच ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सुविधा केली तर गोंधळ उडेल. त्यासाठी प्रभाग कार्यालयांमध्ये चार ते पाच खासगी डॉक्टर, त्यांच्यासोबत पालिकेचा डॉक्टर तैनात ठेवून परप्रांतीय मंडळींना प्रमाणपत्र देण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, कल्याण्-डोंबिवली पालिका हद्दीतून सुमारे ६० ते ७० हजार परप्रांतीय गावी जाण्याची शक्यता एका उत्तरभाषक नेत्याने व्यक्त केली.

खासगी डॉक्टरांची तपासणीही ग्राह्य़

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी डॉक्टरांनी केलेली तपासणी ग्राह्य़ मानली जाणार आहे.  केलेली तपासणी आजार नसल्याच्या अहवालावर प्रमाणपत्र पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले जाईल. खासगी डॉक्टर या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याने हे काम लवकर होईल. पोलीस अधिकाऱ्यांना परप्रांतीयांच्या अर्जावर पुढील कार्यवाही करणे सोपे होईल, असे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.