मीरा-भाईंदर महापालिकेचे भाईंदर पश्चिम येथील शवविच्छेदन केंद्र गेल्या दोन वर्षांपासून सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेमणुकीची प्रतीक्षा करीत आहे. सरकारकडून वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने महानगरपालिकेचे डॉक्टर नाइलाजास्तव शवविच्छेदन करण्याचे काम करत आहेत.
भाईंदर पश्चिम येथे महापालिकेने शवविच्छेदन केंद्र सुरू केल्यानंतर सुरुवातीला शासनाकडून या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली होती. मात्र कामात अनियमितता असल्याने पालिकेने त्यांना २०१२ मध्ये कार्यमुक्त केले. तेव्हापासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे डॉक्टरच शवविच्छेदनाचे काम करत आहेत. महापालिकेची दहा आरोग्य केंद्र व मीरा रोड येथील रुग्णालय यातील १४ डॉक्टर शवविच्छेदनाचे काम करीत आहेत. मध्यंतरी पालिकेच्या डॉक्टरांना शवविच्छेदनाचे अधिकार आहेत की नाहीत यावरून संभ्रम निर्माण झाला. अधिकार नसताना शवविच्छेदन केल्यास कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याची भीती वाटल्याने महापालिकेच्या डॉक्टरांनी दोन वर्षांपूर्वी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे काही दिवस हे शवविच्छेदन केंद्र बंद पडले होते. त्यामुळे शवविच्छेदनाच्या कामासाठी मुंबई अथवा ठाण्याला जावे लागत होते. यात मृतांच्या नातेवाईकांचे चांगलेच हाल झाले होते. त्यानंतर शवविच्छेदनाच्या कामासाठी सरकारी वैद्यकीय अधिकारी देण्याचे शासनाने मान्य केले. तोपर्यंत शवविच्छेदनाचे काम करण्यास महापालिकेचे डॉक्टर तयार झाले. परंतु शासकीय वैद्यकीय अधिकारी देण्यास मान्यता मिळून व महापालिकेने शासनाकडे त्याचा प्रस्ताव पाठवून दोन वर्षे उलटली तरी शासनाकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त झालेला नाही. प्रशासनाकडून वारंवार याबाबत शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे, मात्र त्यानंतरही शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.
महामार्गावरील तसेच रेल्वे अपघातातील मृतदेह तसेच बेवारस मृतदेह या केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले जातात. दररोज सरासरी चार ते पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येत असतात. महापालिकेचे डॉक्टर आपली आरोग्य केंद्रातली जबाबदारी पार पाडून शवविच्छेदनाचे काम करतात.
आधीच आरोग्य केंद्रात कामाचा भार असताना शवविच्छेदनाची अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर देण्यात आली असल्याने डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच शवविच्छेदनाचे काम करण्यास डॉक्टरांची मनापासून तयारी नाही. मात्र अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव ते हे काम करीत आहेत.

महापालिकेला शवविच्छेदनाच्या कामासाठी सरकारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याची नितांत आवश्यकता आहे. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठविण्यात येणार आहे.
– डॉ. प्रकाश जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मीरा-भाईंदर महापालिका