करोना काळात मागणीत ५० टक्क्यांनी घट

भगवान मंडलिक/पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

कल्याण : टाळेबंदीच्या काळात खासगी डॉक्टरांनी व्यवसाय बंद ठेवल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील औषध दुकानांमधील मागणी ५० टक्क्यांनी घटली आहे. सर्दी, ताप आणि खोकल्यावरील उपचारांसाठी नागरिक थेट महापालिका रुग्णालय गाठत आहेत. रुग्णालयात त्यांची करोना चाचणी करून त्यांना औषधेही दिली जातात. त्यामुळे सामान्य तापाच्या रुग्णांनीही खासगी दवाखान्यांकडे पाठ फिरवली आहे. परिणामी औषध दुकानांत येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.

करोना काळात सर्दी, खोकला आणि ताप या आजारांवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध देण्याचे आदेश राज्य शासनाने औषधालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे रोज शेकडो रुग्ण थेट नागरी आरोग्य केंद्रात उपचारांसाठी जात आहेत. तेथे या रुग्णांची चाचणी केली जाते वा लक्षणे पाहून तापाच्या गोळ्या दिल्या जात आहेत. याआधी हेच रुग्ण सर्दी, तापाच्या औषधांचे मोठे ग्राहक असायचे, अशी माहिती ठाण्यातील एका औषध विक्रेत्याने दिली.

संसर्ग कमी झाल्याचा दावा

गर्दीतील प्रवास थांबला आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्याचे संसर्गजन्य रुग्णही कमी येत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश व इतर औषधे घेतात. ज्या डॉक्टरकडे १०० रुग्ण असायचे तेथे ४० रुग्ण येतात. त्याचाही परिणाम औषध विक्रीत जाणवतो. किरकोळ रुग्ण औषध चिठ्ठी घेऊन दुकानात येतो. त्यामुळे ४० टक्के परिणाम व्यवसायात जाणवतो, अशी माहिती डोंबिवलीतील औषध विक्रेते  यग्नेशभाई मेहता यांनी दिली.

रुग्ण तपासणी नसल्याने औषध चिठ्ठी डॉक्टरांकडून रुग्णाला मिळायची बंद झाली. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचे रुग्ण त्यांच्या नियमितच्या गोळ्या घेण्यासाठी फक्त दुकानात येतात. या सगळ्याचा परिणाम औषध विक्रीवर होऊन ५० टक्के फटका औषध विक्रेत्यांना बसला आहे.

– जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना.

जंतुनाशके, चॉकलेट-आइस्क्रीम

* औषध दुकानांमधून दोन महिन्यांच्या काळात ग्राहकांकडून जंतुनाशके , महिला, पुरुष आरोग्य सुरक्षा साधने, रक्तदाब, मधुमेहाच्या औषधांना अधिक मागणी आहे. या काळात आइस्क्रीम व चॉकलेट यांना अधिक मागणी आहे.

* सकाळी ११ पर्यंतच ग्राहक दुकानात येतात. त्यानंतर दुकान पाच वाजता बंद करेपर्यंत ग्राहकांची वाट पाहावी लागते, असे दुकानदारांनी सांगितले.

* काही चलाख दुकानदारांनी औषध दुकानात बेकरीच्या, किराणा वस्तू ठेवून गुपचूप विक्री चालू केली होती. अशा दुकानांवर पालिका आणि पोलिसांनी कारवाई केल्याचे औषध विक्रेते-ग्राहक जनजागृती कक्षाच्या मार्गदर्शक प्रा. मंजिरी घरत यांनी सांगितले.