भिवंडी पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड; विक्रीस बंदी असलेल्या औषधे, गोळ्यांचा बाजार

ठाणे : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची तसेच विक्रीस बंदी असलेल्या गोळ्यांची भिवंडीतील औषधालयांमध्ये (मेडिकल) सर्रास विक्री होत असल्याची गंभीर बाब स्थानिक पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. या गोळ्या आणि औषधांचा वापर तरुणांकडून अमली पदार्थांच्या सेवनासाठी होत असावा असा संशय असून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने नुकतीच औषध विक्रेत्यांची बैठक घेत त्यांना तंबी दिली.  संबंधित औषध दुकानाचा परवाना रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भिवंडी येथे खोकल्याची काही औषधे तसेच विक्रीवर बंदी असलेल्या काही अमली पदार्थांच्या गोळ्यांची विक्री औषधालयांत होत असल्याच्या तक्रारी ठाणे पोलिसांकडे येत आहेत. या तक्रारींचे प्रमाण वाढले असून काही मुलांचे पालक पोलिसांकडे येत या प्रकारांची माहिती देत होते. मोठ्या प्रमाणावर तरुण अमली पदार्थांच्या आहारी जात असून औषधालयांमधून अशा पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे पोलीसही गांगरून गेले होते. या प्रकरणाची गंभीर दखल भिवंडी परिमंडळाचे उपायुक्त योगेश चव्हाण यांनी घेतली. त्यांनी अन्न व औषध विभागाचे साहाय्यक आयुक्त एम. आर. पाटील, भिवंडी महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने नुकतेच भिवंडीतील सुमारे ३५० औषधालयांच्या मालकांना बैठक घेऊन बोलावले. यामध्ये औषधालय संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. औषधालयात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही औषधाची विक्री केली जाऊ नये अशा सूचना औषध विक्रेत्यांना केल्या. तसेच अशा प्रकारे अमली औषधांची विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित औषध दुकान मालकाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. औषध दुकानात जे कामगार काम करतात, त्यांची शैक्षणिक अर्हता तपासून त्यांना कामास ठेवण्याच्या सूचनाही या वेळी पोलिसांनी दिल्या.

…म्हणून औषधांचे व्यसन

गेल्या वर्षभरात अमली पदार्थविरोधी कारवाई मोठ्या प्रमाणात वाढली असून चरस, गांजा तसेच अन्य अमली पदार्थ विक्रेत्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे अमली पदार्थ सहजासहजी मिळेनासे झाले आहेत. या अमली पदार्थांसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अनेक व्यसनाधीन खोकल्याच्या औषधांकडे वळले आहेत. यातील काही औषधांमुळे नशा होत असते. तसेच काही गोळ्याही सेवनानंतर धुंदावस्था निर्माण करतात. यातूनच अनेक व्यसनाधीन तरुण या औषधांची खरेदी करत आहेत.

भिवंडीत अमली पदार्थांची विक्री औषधालयांत होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे शहरातील औषधालयांच्या मालकांची एक बैठक घेतली आहे. डॉक्टरांची चिठ्ठी पाहूनच औषधे द्यावीत, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

– योगेश चव्हाण, उपायुक्त, भिवंडी परिमंडळ.