दिलादायक! एकाच दिवशी मीरा भाईंदरमधील ५६ जण करोनामुक्त

मुंबईसह उपनगरतील करोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. एकीकडे रूग्णांची संख्या वाढत असतानाच मीरा-भाईंदरमधून दिलासादायक वृत्त आले आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीमधील ५६ जणांनी करोनावर मात केली आहे. एकाच दिवशी इतक्या जणांनी मात केल्यामुळे परिसरामधील नागरिकांमध्ये सकारात्मक भाव निर्माण झाले आहेत.

दररोज वाढणाऱ्या रूग्णामुळे मीरा भाईंदरमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. शहरातील करोना रूग्णांची संख्या १५७ वर पोहचली होती. पण आता ही संख्या ५७ वर आली आहे. येथील १०० जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. तसेच नागरिकही लॉकडाउनचे पालन करत आहेत. आगामी काही दिवसांमध्ये शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.

१४ दिवसांच्या उपचारानंतर ५७ जणांची पुन्हा एकदा करोनाची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर सर्व रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले. त्यामुळे सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात एकाच दिवशी ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याची राज्यातील बहुदा ही पहिलीच घटना घडली असावी.