News Flash

डोंबिवलीकर रिक्षावाल्याचा दिलदारपणा, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना देतोय मोफत सेवा

सर्व स्तरातून होतंय कौतुक

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या खडतर काळातही डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य बजावत आहेत. आजही समाजाच्या अनेक स्तरातील लोकं अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी पुढे येत आहेत. मुंबई आणि नजिकच्या भागात पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना कोणी मोफत जेवण पुरवतंय तर काही ठिकाणी किराणा मालाच्या दुकानात या सर्व कर्मचाऱ्यांना माफक दरात धान्य उपलब्ध करुन दिलं जातंय. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात राहणारे ४३ वर्षीय रुपेश रेपाल हे सध्याच्या खडतर काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना मोफत सेवा देत आहेत.

२००१ साली रुपेश सोलापूरवरुन मुंबईत आले. यानंतर त्यांनी डोंबिवलीत रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. लॉकडाउनमध्ये सध्या सर्व सोयीसुविधा बंद असतानाही रुपेश यांनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी आपलं सामाजिक भान राखत मोफत सेवा सुरु केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सेवेबद्दल सर्वांना समजावं यासाठी रुपेश यांनी आपली रिक्षा खास रंगवून घेतली आहे. The Free Press Journal वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सकाळी पाच वाजता रुपेश यांचा दिवस सुरु होतो. आपल्या परिसरातील पोलिस कर्मचारी, डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुपेश त्यांच्या कामाच्या ठिकाणी सोडून येतात. कल्याण आरटीओ विभागानेही रुपेश यांच्या रिक्षेला प्रवासासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. आजही अडीनडीच्या काळात पोलीस कर्मचारी, पालिका अधिकारी, डॉक्टर रुपेश यांना थेट संपर्क साधत आहेत. “सध्याचा काळ खडतर आहे आणि या काळात आपण सर्वांनी एकत्र मिळून उभं राहणं गरजेचं आहे. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना सध्या कामावर जाण्यासाठी वाहनं उपलब्ध नाहीयेत..त्यांच्यासाठी मी ही मोफत सेवा सुरु केली आहे. सध्याच्या काळात मला जशी मदत करता येईल तशी मी करतोय. डॉक्टर, पोलीस आपल्यासाठी जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरत आहेत, आपण नागरिक म्हणून त्यांच्यासाठी एवढं करुच शकतो.” रुपेश यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

यादरम्यान अनेकदा रुपेश यांना स्वतःचा पैसा खर्च करावा लागत आहेत. मात्र याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. सध्या मी पैशाचा विचारच करत नाही, आपण जगलो-वाचलो तरच पैसे उपयोगाला येणार आहेत. त्यामुळे मी सध्या कोणाकडूनही पैसे स्वीकारत नसल्याचं रुपेश यांनी सांगितलं. रुपेश यांच्या कामाची दखल महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घेतली असून त्यांनी रुपेश यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 7:44 pm

Web Title: meet 43 year old auto driver from dombivili who provides free ride in corona warriors crisis scitution psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बदलापूरकरांना दिलासा : १६ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह
2 मुस्लीम व्यक्तीकडून सामान घेण्यास नकार, मीरा रोडमध्ये एकाला अटक
3 ग्रामीण भागातील महिला बचत गटही निराधार
Just Now!
X