पाऊस सर्वाना हवाहवासा वाटतो. वर्षां ऋतू हा सर्जनाचा ऋतू आहे. या काळात निसर्ग फुलतो. विविध पक्षी, फुलपाखरे, रंगबेरंगी कीटक आणि अन्य प्राणी धरतीच्या हिरव्यागार कुशीत बागडतात. मात्र काळानुसार पावसाळय़ातील हे विलोभनीय दृष्य दृष्टीआड होत आहे. आता ही जैवविविधता नष्ट होत चालली आहे. ‘डराव डराव’ करणारे बेडूक, रंगबेरंगी पक्षी, रात्री किर्र करणारे रातकिडे आता कुठेच आढळत नाही.

 

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Loksatta samorchya bakavarun IT CBI ED Polling stations EVM election
समोरच्या बाकावरून: थोडे थांबा.. धीर धरा ‘अच्छे दिन’ येतच आहेत..
how to take Care of indoor plants
घरातल्या झाडांची निगा

अवघे पाऊणशे वयोमान असणारा मी, तेवढेच पावसाळे पाहिले आहेत, हे वेगळे सांगायला नकोच. विशेष म्हणजे हे सर्व ठाण्यातलेच किंवा या परिसरातलेच पावसाळे आहेत. ‘नेमेचि येतो..’ असे आपण म्हणत असलो तरी दरवर्षीच्या पावसाळ्याचा अनुभव वेगळा असतो, असे माझे निरीक्षण आहे. पावसाळ्यातील अनेक ओल्या आठवणी मनात घर करून आहेत.

प्रतिवर्षी जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात पावसाची सुरुवात होणार, असा जणू संकेत आहे. मे महिन्याच्या शेवटी शेवटी आकाशात एखाद दुसरा चुकार ढग डोकावू लागला की समजायचे की ही वर्षां ऋतूची नांदी आहे. वर्षांमागून वर्षे उलटली तरी हा क्रम चालू आहे. याच सुमारास (काही दिवस मागे पुढे) एक परदेशी पाहुणा पक्षी आपल्याकडे येतो. ‘पाऊस आला, पाऊस आला’ असे जणू ध्वनित करणारा त्याचा आवाज ऐकला की घरातील वयस्कर मंडळी आम्हा सगळ्यांना बजावत- ‘पावशा आला आला रे बाबांनो, आता लवकरच पाऊस सुरू होणार.’ एकदा का पाऊस सुरू झाला की त्याचे विभ्रम पाहण्यासारखे असतात. ‘ये गं ये गं सरी, माझे मडके भरी, सर आली धावून, मडके गेले वाहून’ अशी सुरुवातीची स्थिती असायची. पाण्याची लयलूट होणार, असा आशावाद जागवला जाई. कधी कधी तो फसवा ठरे, पण ती अंगवळणी पडलेली बाब असे. काही काळानंतर आपले बस्तान पूर्णपणे बसविलेला पाऊस दीड-दोन महिने मुसळधार कोसळत असे. कैक दिवस सूर्यदर्शन होत नसे. जुलै महिन्यात सूर्य जणू काही रजेवर गेलाय की काय असे वातावरण असे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. यंदा तर जुलै महिन्यात मे महिन्यासारखे कडक ऊन पडले होते. असो. श्रावण महिना उजाडला की ऊन-पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू होई.
श्रावणमासी, हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात पिवळे ऊन पडे!
एकूणच वर्षां ऋतू हा सर्जनाचा ऋतू आहे. अगोदर उल्लेख केलेल्या ‘पावशा’प्रमाणेच कावळे, सुगरण म्हणजे बाया पक्षी, अशा विविध द्विजगणांच्या कुलसंवर्धनाचा हा मोसम. त्यांच्याच जोडीला विविध प्रकारची फुलपाखरे व अन्य रंगीबेरंगी कीटक आणि इतर प्राणी धरितीच्या हिरव्यागार कुशीत बाळसे धरीत असतात. वर्षां ऋतुतला परमोच्च क्षण म्हणजे शेवटी शेवटी नजरेस पडणारे इंद्रधनुष्याचे विलोभनीय दृश्य.
वर्षांकाल कितीही विलोभनीय आणि हवाहवासा वाटणारा असला तरी त्याची दुसरीही एक बाजू आहे. काही वेळा हास्याची लकेर उमटविणारी तर काही वेळा शोकान्त.
हवामान खात्याने वर्तविलेले पावसाबद्दलचे अंदाज त्या काळात बरोबर ठरणारच अशी स्थिती नव्हती. असे अंदाज व्यक्त करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री त्या काळात देशात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती, हे त्याचे एक कारण. ‘पुढील आठवडय़ात भरपूर पाऊस पडणार,’ असा अंदाज व्यक्त झाला की समजायचे तो आठवडा अगदी कोरडाठाक जाणार. एखाद्या मोसमास पाऊस शेतीला पुरेसा पाऊस पडणार नाही असा अंदाज व्यक्त होण्याची खोटी. त्या काळात महापुराने हाहाकार उडण्याची गॅरेंटी. माझ्या आजही स्मरणात असलेला, तत्संबंधी वारंवार सांगितला जाणारा एक विनोदी किस्सा पहा. हवामान खात्यात नोकरी करणाऱ्या आपल्या पतीला उद्देशून त्याची पत्नी त्याला सांगते, ‘इथले हवामान मानवत नसल्याने तुम्ही दुसरीकडे बदली का करून घेत नाही?’
भर पावसाळ्यात ठिकठिकाणी विनोदी स्थिती निर्माण करणारे लहान-मोठे प्रसंग तर अनेक घडत असतात. संततधार पाऊस सुरू असल्यास ठिकठिकाणी (विशेषत: दगड मातीचे रस्ते) हमखास निसरडे होणारच. अशा जागी स्वत:च्याच तंद्रीत चालणाऱ्याला क्षणार्धात अस्मान न दिसले तरच नवल. पाऊस कधी सहसा एकटा येत नाही. त्याची वाऱ्याबरोबरच युती असते. मुसळधार पाऊस पडत असला तर त्याचा सोबतीला वारा हा असतोच. अशा वेळी, इतर वेळी मिटलेली छत्री उघडायचा अवकाश, ती उलटी झालीच म्हणून समजा. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी कडक इस्त्रीचा नवा सूट परिधान करून ऐटीत चालणारा माणूस जर आपल्याच धुंदीत असेल तर जवळून जाणाऱ्या वाहनाच्या चाकांमुळे त्याच्या सुटावर हमखास चिखल उडणार.
ठाणे शहराच्या सभोवती केवळ पावसाळ्यात काही सखल ठिकाणी पाणी साचून मोठाली तळी निर्माण होतात. त्यात अलीकडच्या काळात शहरासभोवती असणारे दगडांचे डोंगर फोडून त्यात ठिकठिकाणी खोलवपर्यंत पाणी साठते. अशा अनेक ठिकाणी तरुणांना पोहण्यासाठी उतरण्याचा मोह आवरत नाही. अशांपैकी कित्येक मुलांना आपले प्राण गमवावे लागण्याच्या घटना गेली काही वर्षे घडत आहेत. आठवणीतल्या या पावसाळ्याचे आख्यान आणखी काही ठळक उल्लेख केल्याशिवाय अपूर्णच राहील. पाऊस आणि पागोळ्या यांचे एक आगळे नाते आहे. घरात बसून छतावरून पडणाऱ्या पावसाच्या पागोळ्या निरखणे खूप आनंददायी होते. काळानुसार आता कौलारू घरे शहरी जीवनशैलीतून जवळपास हद्दपार झाली. त्यामुळे आता छतावरून पूर्वीसारख्या पागोळ्या पडत नाहीत. सध्याच्या पिढीला तर हा शब्दही ठाऊक नाही, अशी स्थिती नाही. पूर्वी पावसाची ‘डराव डराव’ अशी वर्दी देणारे बेडकं आता दिसेनाशी झाली आहेत. पावसाळ्यातील रात्रीला ‘किर्र्र’ असे पाश्र्वसंगीत देणारे रातकिडे आता कुठे आहेत? पावसाळ्यात दिवेलागणीच्या वेळी विविध प्रकारच्या कीटकांचे थवे दिसायचे. विविध रंगांची फुलपाखरे, पतंग यांचा त्यात समावेश होता. आता ठाण्यात ही जैवविविधता आढळत नाही. आता फक्त मलेरिया, डेंग्यू अशा आजारांचे कारण ठरणारे डास उरले आहेत.