News Flash

स्वमदतीचा आधारवड!

औषधोपचाराबरोबरच (शुभार्थीच्या) शुभार्थीला-शुभंकरांना एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे.

tv15स्कि झोफ्रेनिया हा मानसिक आजारच असा आहे की, ज्याचे परिणाम फक्त त्या शुभार्थीलाच नाही तर पूर्ण कुटुंबावरही होत असतात. आधी आजार लक्षात यायला वेळ लागू शकतो. आला तरी त्याचा स्वीकार लगेच होतोच असे नाही, झाल्यावर (स्वीकार) उपचाराबाबत अनेक सल्ले मिळतात. ‘बाहेरचे’ उपचारात वेळ जातो, मग शेवटी मानसोपचारतज्ज्ञाकडे आलेल्या शुभार्थीचा आजार दीर्घकालीन झालेला असतो. त्यामुळे लक्षणे बरी झाली (भास, हिसकेपणा वगैरे) तरी नकारात्मक लक्षणे राहतात. काही करावेसे न वाटणे, न मिसळणे, आळस वगैरे त्यामुळे त्यांच्या शिक्षण, नोकरीवर परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक प्रश्न उभे राहतात/राहू शकतात. नातेवाईक संबंध ठेवणे कमी करतात किंवा शुभार्थीला घेऊन नातेवाईकांकडे जाणे-येणे टाळले जाते. पण तरी शुभंकरांचे मन सतत शुभार्थीविषयीच्या सकारात्मक-नकारात्मक विचार/भावनांनी युक्त राहते. मग ते मोकळे करण्यासाठी एका व्यासपीठाची/गटाची गरज वाटू लागली. यातून स्वमदत गटाची कल्पना उदयास आली.
औषधोपचाराबरोबरच (शुभार्थीच्या) शुभार्थीला-शुभंकरांना एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. सर्व विचार जिथे मोकळेपणे बोलता येतील, प्रश्न मांडता येतील व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशा स्वमदत गटाची म्हणूनच गरज असते. स्वमदत गट हा असा कट्टा आहे का जिथे आपल्यासारखेच समदु:खी आपल्याला भेटतात. तिथे आपण स्वत:साठी जायचे असते व मनातले क्लेश, आनंद, विचार व्यक्त करायचे असतात व तेवढे दोन तास स्वत:साठी द्यायचे असतात. शुभार्थीला शुभपंथावर नेण्यासाठी शुभंकराचे हात बळकट पाहिजेत. त्यांचाच (शुभंकरांचा) एकमेकांना भक्कम आधार असेल तर अधिक सकारात्मकतेने शुभार्थीला बळ देतील. या विचारातून २६ जानेवारी २००८ रोजी डॉ. अद्वैत पाध्ये यांनी त्यांच्या मनोदय ट्रस्टच्या माध्यमातून ‘आधारवड’ हा स्वमदत गट शुंभकरांसाठी सुरू केला व मी फॅसिलिटेट/संचालिका म्हणून या गटाशी जोडले गेले.
या गटात कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेणाऱ्या शुभार्थीचे शुभंकर सामील होऊ शकतात. स्वमदत गटही विनामूल्य असतो. हा गट सुरू झाला तेव्हा दोनच शुभंकर यायचे. हळूहळू संख्या वाढायला लागली. एकमेकांशी संवाद सुरू झाला. मने मोकळी व्हायला लागली. एक सहभावना उदयास आली. स्वमदत गट आपला वाटायला लागला. नंतर लक्षात आले, नुसती मने मोकळी होऊन उपयोग नाही तर प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. म्हणून तज्ज्ञ मान्यवर आमंत्रित केले गेले. त्यात मनोविकारतज्ज्ञ, समुपदेशक, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट होते.
काही सेशन्समध्ये शुभंकरांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले. जेव्हा आपल्या शुभार्थीचा आजार कळतो तेव्हा तो शुभंकरांसाठी धक्का असतो. काही शुभंकर त्या धक्क्यातून लवकर बाहेर येतात, काहींना ते कठीण जाते व ते नैराश्यात जातात. मग शुभार्थीला आजारातून बाहेर काढणे अजून कठीण जाते. जे शुभंकर त्या धक्क्यातून स्वत:ला बाहेर आणतात ते या आजाराची माहिती मिळवायला सुरुवात करतात, आजार समजून घ्यायचा प्रयत्न करतात, त्याच्यावर वाचन करतात, समुपदेशनाला जातात. त्यामुळे वास्तव स्वीकारायला मदत होते. हे सर्व स्वमदत गटामुळे अनुभवायला मिळते. शुभार्थीला कसे सांभाळायचे, त्यांच्याशी कसे वागायचे, त्यांना सक्षम कसे करायचे याचे मार्गदर्शन मिळते.
हा आजार म्हणजे कलंक नाही, आजार (इतर) शरीराला होतात तसाच हा मेंदूचा आजार आहे. त्याची लक्षणे फक्त भावना-वागण्यातून व्यक्त होतात. हे सगळे प्रबोधन स्वमदत गटातून होते. शेवटी स्वमदत गट हे एक प्रकारचे गट समुपदेशनच असते. हे सगळे एकमेकांशी संवाद साधता साधता होते. कधी कोणी तरी अश्रू गाळून मोकळे होतात, कुणी राग दाखवून किंवा कुणी आपले विचार मांडून स्वत:ला मोकळे करतात. मनातील विचार-भावनांचा निचरा होणे महत्त्वाचे! ते येथे होते.
जेव्हा आम्ही त्यांना व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करायला सांगितले तेव्हा त्यात स्वत:विषयी वर्षांनुवर्षे पाळलेल्या समजुती, गैरसमजुती, चांगले गुण, दोष ओळखायला सांगितले. आपल्या गुणांना आपली ताकद कशी बनवायची याचे मार्गदर्शन केले व अजूनही केले जाते.
शुभंकरांमध्ये केवळ शुभार्थीमुळे नैराश्य येते असे नाही तर त्यासाठी/त्यामागे खरी कारणे असतात. आपले व्यक्तिमत्त्व. आपली विचार करण्याची पद्धत, पहिल्यापासूनच आपल्या कुटुंबातल्या इतरांशी असलेले नाते. आपला अहम् वगैरे. यात कसा सकारात्मक बदल करायचा याविषयी मदत करण्याचे, मार्गदर्शन करण्याचे काम स्वमदत गटात आम्ही करत असतो.
काही वेळेला शुभंकरांना विरंगुळाही हवासा वाटतो. त्यासाठी सणानिमित्ताने ते साजरे करणे, स्पर्धा ठेवणे, निबंध/वक्तृत्व वगैरे, खेळ घेणे असेपण करतो. कधी गाण्याचा कार्यक्रम, कधी कथाकथनाचा कार्यक्रम शुभंकरच करतात किंवा बाहेरचे मान्यवर करतात. यातून शुभंकरांच्या कलागुणांना वाव मिळतो.

संपर्क : मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर/ मनोदय ट्रस्ट, ३०१, गौतमेश्वर धाम, टंडन रोड, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व). अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६७४२६५७४.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2015 12:15 am

Web Title: mental disorder schizophrenia
Next Stories
1 विकासकामांसाठी राजकीय दडपण!
2 नगरसेवकांवरील कारवाई टाळण्यासाठी प्रशासनावर दबाव
3 डोंबिवलीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त डोंबिवलीत
Just Now!
X