भाईंदर : मीरा रोड येथील मंगलनगर परिसरात राहणाऱ्या मनोरुग्ण नायजेरियन महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. सुदैवाने नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आईसह बाळाला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मीरा रोड येथील मंगलनगर परिसरात गिफ्ट ओहोक नावाची नायजेरियन महिला ६ वर्षांपूर्वी कामानिमित्त आली. परंतु व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे ती मानसिक रुग्ण होऊन रस्त्यावरच वास्तव्य करत होती. रविवारी रात्री तिला प्रसूतीच्या कळा जाणवू लागल्याचे स्थानिक महिलांच्या लक्षात आले, त्यामुळे महिलेच्या उपस्थितीत तिची प्रसूती तिथेच पार पडली. त्यानंतर  या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. त्यानुसार आई आणि बाळ इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. सुदैवाने बाळ आणि आई सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. बळाच्या पित्या संदर्भात महिलेला माहिती नसल्यामुळे पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे, तर महिला आणि बाळाला ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नायजेरियन समाजाचे अध्यक्ष दाऊद यांनी दिली.