डहाणू, तलासरीत चिकू उत्पादकांचे नुकसान; भाजीपाला, फूल बागायतदारांनाही फटका

नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारल्याने डहाणू, तलासरी या भागातील चिकू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. संपामुळे शेतमाल पडून राहिल्याने अडीच ते तीन कोटी रुपयांचा फटका बागायतदारांना बसला आहे. यंदा कमी पाऊस पडल्याने चिकूचे उत्पादन घटल्याने आर्थिक संकटात सापडलेला चिकू उत्पादनक व्यापाऱ्यांच्या संपामुळे कोलमडला आहे.

डहाणू आणि तलासरी परिसरातून बोर्डी, जांबुगाव, रामपूर, घोलवड, चिखले, नरपड, मसोली, आगवन, सावटा, चिंचणी, तणाशी, केतखाडी, वाणगाव, डेहणे, पळे, तर तलासरीतील  झाई, बोरीगाव, वेबजी, वसा, सूत्रकार, उधवा अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांकडून दररोज २० ते २५ ट्रक चिकू नवी मुंबई येथील बाजारपेठेमध्ये पाठवला जातो. मात्र या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी मंगळवार, २७ नोव्हेंबर ते बुधवार, २८ नोव्हेंबर असा दोन दिवस संप पुकारला. या संपाचा मोठा फटका चिकू उत्पादकांना सहन करावा लागला. सध्या चिकूला १५ रुपये किलो भाव मिळत आहे. मात्र अचानक पुकारलेल्या संपामुळे चिकू साठून राहिले आणि खराब झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांना तर सहा ते सात रुपये किलो या भावाने चिकू विकावे लागले.

तलासरी आणि डहाणू या तालुक्यांतून भाजीपाला आणि फुलेही नवी मुंबईच्या बाजारात येतात. व्यापाऱ्यांच्या संपामुळे त्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. चिकू उत्पादकांचे अडीच ते तीन कोटी तर भाजीपाला व फुले यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी संप पुकारण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले असते तर हे नुकसान टाळता आले असते, असे चिकू बागायतदारांचे म्हणणे आहे.

बाजार समितीत आलेल्या मालाची विक्री ऑनलाइन करावी, तसेच ग्राहकांनी परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यात विक्रीचे पैसे जमा करावे, असे सरकारने सांगितल्याने नवी मुंबईच्या बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. बुधवारी संध्याकाळी व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला.

दोन दिवसांच्या अचानक पुकारलेल्या संपामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील चिकू उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. चिकू उत्पादकांचे अडीच ते तीन कोटींचे नुकसान झाले आहे.

– विनायक बारी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ

बागायतदारांना संपाची पूर्वसूचना दिली असती तर झाडांवरून चिकू उतरवले नसते. त्यामुळे नुकसान टाळता आले असते.

– प्रीत पाटील, बागायतदार, बोर्डी