News Flash

वाढत्या चोऱ्यांच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा मोर्चा

गेल्या दोन आठवडय़ांत तीन व्यापाऱ्यांची दुकाने फोडून जवळपास तीस लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

| September 4, 2015 02:16 am

अंबरनाथमध्ये गेल्या दोन आठवडय़ात चोरांकडून लुटीच्या व दुकाने फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अंबरनाथमधील संतप्त व्यापाऱ्यांनी शिवाजी चौक ते नगरपालिका कार्यालय आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त माणिक बाखरे यांना व पालिकेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली.अंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले असून याचा सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही फटका बसला आहे. गेल्या दोन आठवडय़ांत तीन व्यापाऱ्यांची दुकाने फोडून जवळपास तीस लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे स्थानक भागातील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत पोलीसांच्या कुचकामीपणाचा आणि पालिकेच्या फेरीवाल्यांबाबतच्या धोरणाचा निषेध करत शहरात सकाळच्या सत्रात बंद पाळला. त्यांनी यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्तांना व नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले, अशी माहिती अंबरनाथ व्यापारी संघाचे सचिव युसूफ शेख यांनी दिली.दरम्यान, या वाढत्या चोऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी रात्रीच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेतील स्वामी नगर परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत दोन चोरांना ताब्यात घेतले आहे. तर शहरभरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून सायरनच्या आवाजासहीत ही गस्त शहरात घालण्यात येणार आहे. असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सध्या घडलेल्या घटना या उघडकीस आणून त्यात जप्त झालेला मुद्देमाल परत करणे ही आमची प्राथमिकता असून ही त्यादृष्टीने आम्ही कार्यवाही करत आहोत. तसेच, या तपासाबाबत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी देखील कळवणार आहोत. या घटना प्रभावीपणे काम करत आम्ही लवकरात लवकर उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-माणिक बाखरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबरनाथ

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 2:16 am

Web Title: merchants growing protest rally
Next Stories
1 भिवंडी-कल्याण भविष्यात मेट्रोमय!
2 उपनगरी सेवेचे वेध
3 विकास प्रकल्पांच्या नावाने बोंब
Just Now!
X