महावितरणच्या वीज बिलांमधील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा आणि अधिक अचुकतेने वीज बिलाचे वितरण व्हावे यासाठी मोबाइल अ‍ॅपवरून मीटर नोंदणी करण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. भांडुप आणि कल्याण परिमंडळामध्ये ही योजना राबवण्यात येत असून सप्टेंबर महिन्यात या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात  या उपक्रमाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली. त्यास ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळाला. त्यामुळे यापुढे वीज मीटर नोंदणी मोबाइल अ‍ॅप सुविधेद्वारे करण्याची यंत्रणा अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अ‍ॅपवर मीटरचा फोटो काढल्यानंतर त्यावरील नोंदी थेट सव्‍‌र्हरमध्ये पोहचवली जाणार आहे. त्यामुळे फोटो काढून कर्मचाऱ्यांकडून त्याची नोंदणी करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यांचा हस्तक्षेप कमी होणार आहे. अधिक अचुकतेने महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय जीपीएस पद्धतीने या मीटरच्या नोंदीची परिपूर्ण माहितीही नोंदवली जाणार असल्याने त्यातील त्रुटी कमी झाल्या आहेत, अशी माहिती महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

महावितरणशी नागरिकांचा थेट संपर्क होण्यासाठी मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी जोडण्यात आली असून अ‍ॅपमुळे आता अधिक संपर्क करणे शक्य झाले आहे. नागरिकांना बिल भरणे, तक्रारी करणे आणि नवी जोडणीसाठी या अ‍ॅपची मदत होऊ लागली आहे. नव्या वीज जोडणीसाठी या अ‍ॅपचा वापर मोठय़ाप्रमाणात वाढला आहे. या अ‍ॅपवरून नवी जोडणीसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना २४ तासांमध्ये वीज जोडणी देण्याचे धोरण महावितरणने निश्चित केले आहे. यानुसार सगळ्या प्रकारच्या ग्राहकांना २४ तासांमध्ये वीजपुरवठा मिळू शकणारा आहे.

महावितरणचे संचालक संजीव कुमार यांनी सर्व मंडळांच्या मुख्य अभियंत्याना यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार ऑगस्टमध्ये कल्याण मंडळातील २ लाख ग्राहकांच्या वीज मीटर नोंदणी मोबाइल अ‍ॅपद्वारे करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात ही नोंदणी १०० टक्के करण्यात येणार आहे.

राज्यातील साडेचार लाख ग्राहकांकडून अ‍ॅपचा वापर..

गेल्या दीड महिन्यात राज्यातील साडेचार लाखांवर वीज ग्राहकांनी या मोबाइल अ‍ॅपचा वापर केला आहे. प्ले स्टोरवर हे अ‍ॅप उपलब्ध असून ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे. त्यापाठोपाठ महावितरणच्या वेबसाइटवरूनही हा अ‍ॅप डाऊनलोड करता येतो. याशिवाय अ‍ॅपल प्ले स्टोअर व विन्डोज स्टोअरमधूनही हे अ‍ॅप उपलब्ध आहे. या अ‍ॅपमुळे ग्राहकांना महावितरणची वीजसेवा एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.

भांडुप परिमंडळात अ‍ॅपद्वारे ५८५ मीटर जोडण्या..

मोबाइल अ‍ॅपमधून गेल्या महिनाभरात भांडुप परिमंडळात ५८५ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, तर मीटर रीडिंग ‘अ‍ॅप’व्दारे प्रोसेसिंग सायकलनुसार २ लाख २६ हजारहून अधिक वीजमीटरचे फोटो रीडिंग घेण्यात आले आहेत. याशिवाय मोबाइल अ‍ॅपद्वारे उपकेंद्रातील फीडर व वितरण रोहित्रांचेही रीडिंग अ‍ॅपद्वारे घेण्यात येत आहे.  भांडुप नागरी परिमंडळाच्या पनवेल विभागाअंतर्गत खारघर उपविभाग, वाशी विभागअंतर्गत कोपरखैरणे उपविभाग, नेरूळ विभागअंतर्गत नेरूळ, पामबीच उपविभाग, सी.बी.डी. हे उपविभाग तसेच ठाणे विभाग १,२,३, अंतर्गत येणाऱ्या गडकरी, किसान नगर, कोपरी, पॉवर हाऊस हे उपविभाग तसेच भांडुप विभागाअंतर्गत भांडुप (पूर्व) उपविभाग, मुलुंड विभागाअंतर्गत नीलमनगर उपविभाग आणि वागळे इस्टेट विभागाअंतर्गत कोलशेत उपविभाग येथील ग्राहकांना आता ही सुविधा उपलब्ध असून उर्वरित उपविभागांतही सप्टेंबरमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

 सतीश करपे, मुख्य अभियंता, भांडुप नागरी परिमंडळ.