News Flash

मेट्रोची लगबग, पण कारशेड कागदावरच

एमएमआरडीएने याबाबत राज्य सरकारकडे हरकतही नोंदवल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

प्रतिनिधिक छायाचित्र

एमएमआरडीए-महापालिकेतील विसंवादामुळे प्रकल्पाला विलंब होण्याची चिन्हे

ठाण्यापाठोपाठ कल्याण-भिवंडीत मेट्रो धावणार हे स्पष्ट होऊ लागले असले तरी या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या कारशेडच्या जागेचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. ठाणे महापालिकेने घोडबंदर मार्गावरील ओवळा भागातील ४० हेक्टर जागा कारशेडसाठी आरक्षित करण्यास यापूर्वीच हिरवा कंदील दाखविला असला तरी त्यापैकी १० हेक्टर जागा जलद वाहतूक व्यवस्थेसाठी आरक्षित ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. यावरून पालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरणात निर्माण झालेला विसंवाद दूर करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून न झाल्याने एकूणच मेट्रो प्रकल्पाच्या निर्धारित वेळेतील अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकीकडे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी वडाळा- ठाणे- कासारवडवली या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभ उरकण्याचे बेत आखले जात असताना, एमएमआरडीएने ठाणे- भिवंडी- कल्याण मार्गावर मेट्रो सुरू करण्यास बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे या पट्टय़ातील प्रवासी वाहतुकीचा सुलभ व जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र मेट्रोची लगबग सुरू झाली असली तरी या दोन्ही प्रकल्पांसाठी महत्त्वाचे असलेल्या ओवळा येथील कारशेडचा प्रश्न अद्याप निकालात निघू शकलेला नाही.

ओवळा येथील ४० हेक्टर जागेवर कारशेड उभारण्यासाठी आरक्षण बदलाच्या प्रस्तावास यापूर्वीच महापालिकेने मान्यता दिली आहे. या भागातील १९ हेक्टरचा हिरवा पट्टा यामुळे नष्ट होण्याची भीती असल्याने पर्यावरणप्रेमीही या ठिकाणी कारशेड उभारणीस विरोध करीत आहेत. याशिवाय स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनही ही जागा संपादित करण्याचा मुद्दाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडला आहे. या सगळ्या मुद्दय़ांचा एकत्रित विचार करीत यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव जुलै २०१४ मध्ये महापालिकेने मंजूर केला. मात्र त्या वेळी या ४० हेक्टर जागेपैकी १० हेक्टर जागा जलद वाहतुकीसाठी आरक्षित ठेवावी, असा स्वतंत्र ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेने केला आहे. या ठरावास एमएमआरडीएचा आक्षेप असल्याचे समजते. एमएमआरडीएने याबाबत राज्य सरकारकडे हरकतही नोंदवल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एमएमआरडीएच्या हरकतीनंतरही यासंबंधीच्या हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू केली जाऊ शकते. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने कारशेडचा प्रश्न निकाली निघालेला नाही, असे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2016 1:26 am

Web Title: metro car shed issue in thane
Next Stories
1 भिवंडी परिसर विकासाच्या रडारवर
2 कळव्यात चार सुसज्ज मासळी बाजार
3 भ्रष्टाचाऱ्यांना निर्दोष सोडल्याने वसईत जनक्षोभ
Just Now!
X