कामाला सुरुवात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतल्या वडाळापासून ठाण्यातल्या घोडबंदर रोड येथील कासारवडवलीपर्यंत येणारी ‘मेट्रो’ आता मीरा-भाईंदर तसेच पुढे दहिसपर्यंत येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.

मीरा-भाईंदरहून मुंबईला जायचे झाल्यास रेल्वे हा प्रवशांचा सर्वाधिक पसंतीचा मार्ग आहे. परंतु लोकलवर वाढत असलेला ताण पाहाता दिवसेंदिवस रेल्वे प्रवास कठीण होत चालला आहे. बसनेदेखील मुंबई गाठण्याचा पर्याय आहे परंतु वाहतूक कोंडीमुळे हा पर्याय फारच वेळखाऊ आहे. त्यामुळे मुंबईत यशस्वी ठरलेली मेट्रोची सुविधा मीरा-भाईंदरलाही मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी मीरा-भाईंदरच्या पाणी योजनेच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात अंधेरीहून दहिसपर्यंत येणारी मेट्रो मीरा-भाईंदपर्यंत आणण्याची घोषणा केली होती. परंतु नुकत्याच घोषित झालेल्या अंधेरी ते दहिसपर्यंतच्या मेट्राच्या मार्गात मीरा-भाईंदरचा समावेश न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. दहिसर ते अंधेरी या मेट्रो मार्गाचे कामदेखील सुरू होणार असल्याने मीरा-भाईंदरच्या नागरिकांना मेट्रोने मुंबई गाठणे शक्य होणार आहे.

लवकरच मान्यता घेऊन कामाला सुरुवात

मुख्यमंत्री नुकतेच एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आले असता आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील कासारवडवली हा मेट्रो मार्ग मीरा-भाईंदपर्यंत व पुढे दहिसपर्यंत वाढवावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. तशा सूचना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या संदर्भात एमएमआरडीचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मेट्रोच्या सुधारित प्रस्तावाला लवकरच मान्यता घेऊन वडाळा ते कासारवडवली या मार्गाचे काम सुरू झाले की मीरा-भाईंदर ते दहिसर मार्गाचे कामदेखील सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.