ठाण्यातही मेट्रोच्या कामासाठी रात्री उशिरा तीन हात नाका येथे १० ते १५ झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ही झाडे तोडण्यात आली असून याविरोधात ठाण्यातील पर्यावरणवादी संघटनांकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे. रात्री २ वाजता करण्यात आलेल्या या झाडांच्या कतलीमुळे विविध पर्यावरणवादी संघटनांनी गुरुवारी सायंकाळी तीन हात  नाका येथे एकत्र येत आंदोलन केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी २ हजार २३८ झाडे कापण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक पर्यावरणवादी व्यक्तींनी आंदोलन उगारले होते. उच्च न्यायालयाच्या अखेरच्या निर्णयानंतर प्रशासनाकडून रातोरात ही झाडे कापण्यास सुरुवात झाली होती. याची पुनरावृत्ती ठाण्यातही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील ३ हजाराहून अधिक झाडे ही मेट्रोच्या बांधकामामुळे बाधित होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर झाले होते. दरम्यान पर्यावरणवाद्यांकडून याविरोधात बाधित होणाऱ्या वृक्षांविषयी आणि मेट्रो कामाविषयी अशा दोन वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर निर्णय देताना न्यायालयाने झाडे कापण्यास परवानगी दिली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने बुधवारी रात्री दोन वाजता झाडे तोडण्यास सुरुवात केली. तीन हात नाका येथील मुख्य चौकातील १० ते १५ झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरणवादी रोहित जोशी यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी समाजमाध्यमांवर पसरल्याने शहरातील विविध नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी प्राधिकरणाविरोधात संताप व्यक्त केला. तीन हात नाका येथे विविध पर्यावरणवादी आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केले. चुकीच्या पद्धतीने गैररीत्या ही झाडे तोडण्यात आल्यामुळे ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला नोटीस पाठवणार असल्याचे पर्यावरणवादी रोहित जोशी यांनी सांगितले.

दरम्यान याप्रकरणी ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदार पाटील आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी दिलीप कवटकर यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.