अंधेरी-मानखुर्द, वाशी-बेलापूर मेट्रो प्रकल्प जोडणार; अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील नियोजित विमानतळ जलद परिवहन व्यवस्थेने जोडता यावे यासाठी अंधेरी ते मानखुर्द आणि पुढे वाशी ते बेलापूर या मार्गावरील नियोजित मेट्रो प्रकल्पामधील आर्थिक आणि तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून या प्रकल्पांचा आर्थिक भार एमएमआरडीए आणि सिडकोने संयुक्तपणे उचलावा यासाठी दोन्ही प्राधिकरणांमध्ये खलबते सुरू झाली आहेत.

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ जोडण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत अंधेरी ते मानखुर्दपर्यंतचा प्रकल्प अहवाल एमएमआरडीएने यापूर्वीच तयार केला आहे; परंतु मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ जोडणीबाबतचा निर्णय सिडकोकडून अद्याप प्रलंबित आहे. शिवाय मानखुर्द ते वाशीदरम्यान ही मेट्रो जोडण्यासाठी खाडीवर पुलाची उभारणी करावी लागणार आहे. यासाठी येणारा खर्च नेमका कुणी उचलायचा यावरून एमएमआरडीए आणि सिडको या दोन्ही प्राधिकरणांमध्ये पुरेशी एकवाक्यता नाही. नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पांविषयी सिडकोकडून स्पष्टता येत नाही तोवर अंधरी ते तळोजा मेट्रोचा एकत्रित प्रकल्प अहवाल तयार करणे शक्य होत नाही, असा मुद्दा एमएमआरडीएच्या प्रशासकीय प्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडला आहे. या सगळ्या मुद्दय़ांचा निपटारा लवकरात लवकर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी  दिल्याने गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासंबंधी खलबते उशिरा का होईना सुरू झाली आहेत.

मानखुर्द ते पनवेल हा मेट्रो मार्ग वाशी खाडीमुळे तांत्रिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरेल का याविषयी सुरुवातीला साशंकता होती. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या प्रकल्पातील तांत्रिक आणि आर्थिक अडचणींवर मार्ग काढला जात आहे, अशी माहिती सिडकोतील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मानखुर्दपुढील मार्गिकेचा खर्च सिडकोने करावा असा एमएमआरडीचा प्रस्ताव आहे. त्यावरही विचार केला जात असून यासंबंधीचे म्हणणे लवकरच एमएमआरडीएला कळविले जाईल, जेणेकरून मानखुर्द पुढील प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामास गती मिळेल, असा दावा सूत्रांनी केला.

सिडकोच्या उत्तराची प्रतीक्षा

एमएमआरडीएने मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकमेकांशी मेट्रो प्रकल्पाने जोडले जावेत असा प्रस्ताव यापूर्वीच सिडकोपुढे ठेवला आहे. अंधेरी ते मानखुर्द या ४२ किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रोसाठी प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे. वाशी खाडी ओलांडून हा मेट्रो प्रकल्प विमानतळापर्यंत जोडण्याचा प्रस्ताव सिडकोपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र, अद्याप सिडकोकडून ठोस निर्णय झाला नसल्याचा मुद्दा एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्याचे वृत्त आहे.

नवी मुंबई विमानतळ चहूबाजूंनी मेट्रो मार्गानी जोडले जावे यासाठी सिडकोने यापूर्वीच काही प्रकल्पांची आखणी केली आहे. वाशी ते बेलापूर हा मेट्रो मार्ग याच योजनेचा एक भाग आहे. एमएमआरडीच्या प्रस्तावावर सिडकोत गांभीर्याने विचार सुरू असून यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

– मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी सिडको