पहिल्या टप्प्यात ठाणे शहरालाच प्राधान्य 

ठाणे मेट्रोचा विस्तार गायमुखपर्यंत करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविताच  पालिकेने शहरातील अंतर्गत भागांत मेट्रोच्या आखणीसाठी हालचाली सुरू केल्या असल्या तरी या प्रकल्पाच्या सुसाध्यता अहवालातून तूर्तास कळवा-मुंब्रा आणि दिवा परिसराला वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

ठाणे शहराच्या तुलनेत कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांना रेल्वे मार्ग जवळ असल्याने अंतर्गत मेट्रो मार्गाचे जाळे विणताना मूळ ठाणे शहराचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशा सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत मेट्रो मार्गाचा खर्च कमी होईल तसेच खासगी भागीदार शोधताना हा प्रकल्प अधिक व्यवहार्य होईल, अशी भूमिका असल्याचे सांगण्यात येते.

ठाणे महापालिकेच्या मूळ विकास आराखडय़ात अंतर्गत वाहतुकीच्या विविध प्रकल्पांसाठी मार्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. हा मार्ग नेमका कोणता असावा, याचा निर्णय घेण्याचे अधिकार पालिकेस असले तरी तो कोठून जाईल याविषयी विकास आराखडय़ात बरीच स्पष्टता ठेवण्यात आली आहे. पालिका हद्दीतील शहरांची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहचली आहे. १२ लाखांहून अधिक नागरिक ठाणे, घोडबंदर भागात राहतात. त्यांच्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक हा एकमेव पर्याय आहे. मूळ ठाणे शहर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, वसंत विहार, लोकपुरम आणि घोडबंदर मार्गावरील गृहसंकुलांमधील रहिवाशांना रेल्वेने प्रवासासाठी केवळ ठाणे स्थानकाचा पर्याय आहे. त्यामुळे मध्य रेल्वे, पालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नवीन ठाणे स्थानकाच्या उभारणीची आखणी सुरू केली आहे. नव्या स्थानकाची उभारणी झाली तरीही शहरासाठी अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची उभारणी करावी लागेल, असे नियोजनकर्त्यांचे मत आहे. शहराच्या अंतर्गत भागात मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासंबंधी नेमण्यात आलेल्या संस्थेकडून लवकरच सुसाध्यता अहवाल प्राप्त होणार आहे.

खर्च कमी करण्याचा प्रयत्न

अंतर्गत मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यात ठाणे शहराचा विचार व्हावा, अशा सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वेक्षण संस्थेस दिल्या आहेत. कळवा-मुंब्रा, दिवा परिसरासाठी रेल्वे स्थानक जवळ असल्यामुळे तिथे अंतर्गत मेट्रोची तूर्तास आवश्यकता नाही, असे प्रशासनाचे मत आहे. येत्या काही दिवसांत सर्वेक्षण संस्थेकडून अहवाल प्राप्त होताच यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडला जाणार आहे. कळवा- मुंब्रा मार्ग वगळल्यास या प्रकल्पावरील खर्च आवाक्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अंतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी विकास आराखडय़ात ठोस आरक्षण आहे. मार्ग कसा असेल, किती खर्च येईल याचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कळवा-दिवा-मुंब्रा परिसराला रेल्वेचे जाळे सोयीचे आहे. त्यामुळे अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प आखताना ठाणे शहराचा प्राधान्याने विचार करावा, अशा सूचना संबंधित संस्थेस देण्यात आल्या आहेत.

संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका