२७ किमी भूमिगत; ५ किमी उन्नत मार्ग
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा ‘मेट्रो लाइन ४’ अर्थात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या सुमारे ३२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्ग प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. त्यामुळे या प्रकल्पाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पोहोचण्यासाठी अवघा ६४ मिनिटांचा वेळ लागणार असून यादरम्यान ३० स्थानके असणार आहेत. ठाणे रेल्वे मार्गापासून आठ ते दहा किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या घोडबंदरवासीयांना या प्रकल्पामुळे सर्वाधिक फायदा होणार असून घोडबंदर परिसरामध्ये मेट्रोची एकूण आठ स्थानके आहेत. यासह ठाण्यात एकूण १२ स्थानके असून त्याचा फायदा शहरातील लाखो प्रवाशांना होणार आहे. जमिनीखालून १५ ते २० मीटर अंतरावरून ही मेट्रो धावणार आहे
ठाणे शहराच्या घोडबंदर पट्टय़ामध्ये झपाटय़ाने विकास होत असून येथील शहरीकरणाचा वेग लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने येथील वाहतूक सुविधांसाठी मेट्रो प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या भागाचा प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी महानगर विकास    प्राधिकरणाने मेसर्स कन्सलटिंग इंजिनीअिरग सव्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली असा सुमारे ३२ किलोमीटरचा आराखडा या कंपनीने तयार केला आहे. ठाण्याची ही मेट्रो सध्या घाटकोपर-अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मेट्रोशी तसेच भविष्यात येणाऱ्या मोनो रेल्वेशी जोडली जाईल. त्यामुळे मधल्या स्थानकात उतरून मार्ग बदलून जाता येणार आहे. एमएमआरडीएच्या या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून त्यासाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वडाळा-कासारवडवली ठाणे मेट्रो हा मार्ग पूर्णपणे उन्नत नसून त्या ऐवजी वडाळा ते कापुरबावडीपर्यंत मेट्रो भूमिगत असेल. तर कापुरबावडीपासून कासारवडवलीपर्यंत उन्नत स्थानके असतील.
मेट्रोची स्थानके
भक्ती पार्क मेट्रो, अणिक नगर, प्रियदर्शनी, कुर्ला नेहरूनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, विद्याविहार मेट्रो, घाटकोपर मेट्रो, आर-सीटी मेट्रो, गोदरेज कॉलनी, विक्रोळी मेट्रो, गांधीनगर, कांजुरमार्ग मेट्रो, जनता मार्केट, भांडुप मेट्रो, शांग्रिला, सोनापूर, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, मुलुंड नाका, ठाणे तीनहात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापुरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, पाटलीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली.
ठाणे मेट्रो प्रकल्पावर दृष्टिक्षेप
मुंबई मेट्रो मार्ग ४ (वडाळा-घाटकोपर-तीन हात नाका-कासारवडवली मेट्रो प्रकल्प)

पूर्ण लांबी – ३२ किलोमीटर (२७ किलोमीटर भूमिगत, ५ किलोमीटर उन्नत)

एकूण ३० स्थानके. २० मुंबईत तर १२ ठाण्यात

२६ स्थानके भूमिगत तर सहा स्थानके उन्नत (एलिव्हेटेड)

वडाळा, आणिक, प्रियदर्शनी भागात पूर्व द्रुतगती मार्गाखालून कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर आणि पुढे एसबीएस रोडमार्गे ठाण्यामध्ये प्रवेश करणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानक, तीन हात नाका, कापुरबावडी-कासारवडवली (घोडबंदर) या मार्गावरून मेट्रोचा मार्ग असणार आहे.

ठाण्यात सुमारे १०.८७ किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात रेल्वे स्थानकापासून घोडबंदर मार्गापर्यत ११ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.