रात्रभर कामे सुरू असल्याने शांतताभंग;बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही व्यत्यय

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणेकरांचा भविष्यातील प्रवास कोंडीमुक्त आणि अधिक सुखकर व्हावा यासाठी शहरात मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असले तरी रात्रीच्या वेळेत कामाच्या आवाजाचा गोंगाट सुरू असल्याने परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. सध्या बारावी तसेच दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या आवाजामुळे एकाग्रता भंग होत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री दहा वाजेनंतर आवाजाची कामे करण्यास बंदी असतानाही या ठिकाणी अशी कामे केली जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे ते घोडबंदपर्यंत मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या कामामुळे मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मार्गरोधक उभारण्यात आले असून त्यामुळे हे दोन्ही मार्ग अरुंद होऊन या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या कामामुळे गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर अक्षरश: मेटाकुटीला आले असून ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे. असे असतानाच आता मेट्रो कामांमुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत असल्याचे समोर आले आहे. तीन हात नाका ते माजिवाडा या भागात गेल्या काही दिवसांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून त्यामध्ये खांब उभारणीसाठी खड्डे खोदणे, खड्डय़ांमध्ये लोखंडी गज उभारणे आणि त्यामध्ये सिमेंट काँक्रीट ओतणे अशा कामांचा समावेश आहे. या भागात काही ठिकाणी खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी अजूनही खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. यंत्राद्वारे खड्डे खोदले जात असून त्याचा परिसरात प्रचंड आवाज होतो. याशिवाय, खड्डय़ात उभारलेल्या लोखंडी  गजाभोवती लोखंडी पत्र्याचे साचे लावून त्यात सिमेंट काँक्रीट ओतण्यात येते. मात्र, लोखंडी गजाभोवती लोखंडी साचा उभारणे आणि सिमेंट काँक्रीट ओतल्यानंतर तो पुन्हा काढणे या कामामुळेही आवाज होतो. सकाळच्या वेळेत या कामाचा दणदणाट सुरू असतो. मात्र, आता रात्रीच्या वेळेतही ही कामे करण्यात येत असल्यामुळे रात्रीही कामाच्या आवाजाचा दणदणाट परिसरात सुरू असतो, असे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

ठाण्यातील तीन हात नाका ते माजिवाडा या भागात मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी रात्री दहा वाजेनंतर आवाजाची कामे करण्यात येत नाहीत. रात्रीच्या वेळी अशी कामे होत असतील तर ती तात्काळ बंद करण्यात येतील.