08 March 2021

News Flash

कल्याणमधील ‘म्हाडा’ची घरे लाभार्थीसाठी सज्ज

कल्याण तालुक्यातील खोणी गावात सव्‍‌र्हे क्रमांक १६२ वर चौदा माळ्याच्या इमारती उभारण्यात येणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

|| भगवान मंडलिक

लवकरच नवीन घरांसाठी सोडत :- कल्याण तालुक्यातील खोणी, शिरढोण गावांच्या हद्दीत ‘म्हाडा’तर्फे बांधण्यात येणारी २६ हजार १९३ घरे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येणारी ही घरे पुढील वर्षांपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार आहेत. मागील दीड वर्षांपासून इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.

कल्याण तालुक्यातील खोणी गावात सव्‍‌र्हे क्रमांक १६२ वर चौदा माळ्याच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. येथील गृह प्रकल्पात आर्थिक दुर्बल घटकांसाठी ७ हजार १५० सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ६६० सदनिका बांधण्यात येणार आहेत. या गृह प्रकल्पासाठी ८७६ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिरढोणमधील सव्‍‌र्हे क्रमांक ८६, ९५ या आरक्षित जमिनींवर सात माळ्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. दुर्बल घटकांसाठी १३ हजार ६०८, अल्प उत्पन्न गटासाठी २ हजार ९४० सदनिका बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी १२७ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील नागरीकरण झालेल्या बारावे गावाच्या हद्दीत गट क्रमांक २७ या आरक्षित जमिनीवर आर्थिक दुर्बल घटकांसाठी (इकॉनॉमिक वीकर सेक्शन) ८३४ सदनिका बांधण्यात येणार आहेत. वाहनतळासह चौदा माळ्यांच्या इमारती बारावेच्या जागेत उभारण्यात येणार आहेत. या गृह प्रकल्पासाठी ७९ कोटी ७९ लाख रुपये कोकण हाऊसिंग बोर्डाने निश्चित केले आहेत. कल्याण शहराच्या वेशीवर नवीन कल्याण म्हणून विकसित झालेल्या परिसरात बारावे गाव आहे. या भागात उच्च मध्यमवर्गीय रहिवासी अधिक संख्येने राहतात. या वस्तीच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी हा गृह प्रकल्प आकाराला येणार आहे.

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची शिरढोण, खोणी येथील घरांची सोडत यापूर्वीच काढण्यात आली आहे.  इमारत बांधकामे पूर्ण झाली त्याप्रमाणे  सोडती काढण्यात येत आहेत. शिरढोण, खोणी येथील बहुतांशी प्रकल्प पूर्ण झाला आहे.   लवकरच म्हाडाची कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाची घरांची सोडत निघण्याची शक्यता आहे.

– वैशाली गडपाले, जनसंपर्क अधिकारी, कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:44 am

Web Title: mhada houses in kalyan are ready for the beneficiary akp 94
टॅग : House
Next Stories
1 भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
2 भाजपच्या खेळीपुढे काँग्रेस चीत!
3 ‘लोकांकिका’च्या ठाणे विभागीय फेरीचे वेध
Just Now!
X