दिवा, कल्याण परिसरातील १०० हेक्टर ताब्यात

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्य़ांत तब्बल १३ ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी गृहसंकुले उभारण्याच्या राज्य सरकारच्या प्रकल्पाला आता गती मिळू लागली असून महसूल विभागाने ठाणे जिल्ह्य़ातील दिवा आणि कल्याण परिसरांतील तब्बल १०० हेक्टर जमीन यासाठी नुकतीच म्हाडाकडे वर्ग केली आहे. दिवा परिसरास लागूनच असलेल्या कल्याण-शिळ मार्गालगतच्या भंडार्ली, गोठेघर तसेच कल्याण तालुक्यातील खोणी, शिरढोण, बारावे या भागात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी १३५०० घरे उभारली जातील, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

नागरिकांना परवडतील अशी घरे उभारली जावीत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असून या प्रकल्पांसाठी जमिनीचा तुटवडा भासू नये यासाठी महसूल विभागाच्या ताब्यातील जमीन म्हाडाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश मध्यंतरी राज्य सरकारने दिले होते. मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, पुण्यासह तब्बल २२ जिल्ह्य़ांमध्ये म्हाडाच्या माध्यमातून घरांची उभारणी करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच यासाठी लागणारी जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आली. एक रुपया चौरस मीटर दराने ही जमीन म्हाडाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घरांच्या विक्रीतून म्हाडाला मिळणाऱ्या नफ्यातील ७० टक्के  रक्कम शासनाकडे जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्य़ांत तब्बल १३ ठिकाणी म्हाडाचे मोठे गृहप्रकल्प आकारास येणार आहेत. ठाणे आणि कल्याण तालुक्यांतही या प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आल्याने ही घरे नेमकी कोठे उभी रहाणार याविषयी कमालीची उत्सुकता होती. महसूल विभागाने म्हाडा घरांच्या उभारणीसाठी कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि दिवा पट्टय़ातील जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने या संपूर्ण पट्टय़ाच्या नागरीकरणाचा अधिक वेग येणार आहे.

महसूल विभागाने जानेवारी महिन्यात यासंबंधीचा आदेश काढत तब्बल १०० हेक्टर जागा म्हाडाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी लोकसत्ताला दिली. ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या महापालिका हद्दीतील शहरांचा विकास मोठय़ा प्रमाणावर झाल्याने नव्याने नागरीकीकरण होत असलेल्या पट्टय़ात परवडणाऱ्या घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे कल्याणकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ठाणे तालुक्यात गोठेघर आणि भंडार्ली तर कल्याण तालुक्यात खोणी, शिरढोण आणि बारावे पट्टय़ातील जमीन म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या जमिनीवर अल्प, मध्यम उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी किमान १३ हजार ५०० घरांच्या उभारणीचा प्रस्ताव असून म्हाडामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे, असेही कल्याणकर यांनी स्पष्ट केले.

  • ठाणे तालुक्यात गोठेघर आणि भंडार्ली तर कल्याण तालुक्यात खोणी, शिरढोण आणि बारावे पट्टय़ातील १०० हेक्टर जमीन म्हाडाच्या ताब्यात
  • अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १३५०० घरांच्या निर्मितीचा विचार
  • पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी केंद्र सरकारकडून प्रत्येकी दीड लाख रुपये तर राज्य शासनाकडून एक लाख रुपये अनुदान.