|| ऋषिकेश मुळे

मोकळय़ा भूखंडांवर भंगार वाहने;  रस्त्यांवर अवैध उभ्या वाहनांमुळे कारखान्यांना अडथळे :-  ठाणे जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यांसमोर मोठय़ा प्रमाणावर अवैधपणे उभी राहणारी वाहने उद्योजकांसाठी डोकेदुखी ठरत असून यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही वाहतूक अथवा इतर प्रशासकीय यंत्रणा दाद देत नसल्यामुळे उद्योजक मेटाकुटीस आले आहेत. या औद्योगिक वसाहतींमधील मोकळ्या जागांचा वापर भंगारात निघालेली वाहने उभी करण्यासाठीदेखील केला जात असून त्यामुळे कारखान्यांतील मालवाहू वाहनांना या भागातून प्रवास करणे जिकिरीचे ठरत असल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यातील वागळे इस्टेट, अंबरनाथ-बदलापूर, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या औद्योगिक परिसराला रस्त्यावर पडलेले खड्डे, जागोजागी पडलेला कचरा या समस्यांनी ग्रासले असतानाच आता कारखान्यांच्या समोर अवैधपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांच्या समस्येने उद्योजकांना मेटाकुटीला आणले आहे. त्याचसोबत औद्योगिक परिसरांतील रस्त्याच्या दुतर्फा वर्षांनुवर्षे अनेक भंगार गाडय़ा त्याच अवस्थेत पडून असल्याने कारखान्यांच्या मालवाहनांना मार्ग काढणे जिकिरीचे झाले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात अनेक लघू आणि मध्यम स्वरूपाचे कारखाने आहेत. या कारखान्यांच्या प्रवेशद्वारांसमोर नवी मुंबई तसेच मुंबई परिसरातील कंपन्यांच्या बसगाडय़ा उभ्या राहत असून इतर वाहनांनीही या परिसरातील रस्ते गिळंकृत केले आहेत. तसेच वागळे इस्टेट येथील भवानीनगर, इंदिरानगर या परिसरात राहणारे ओला, उबर वाहनांचे चालक त्यांची वाहने याच औद्योगिक परिसरात उभी करत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागा या वाहनांनी व्यापून गेल्या आहेत. परिणामी कारखान्यांची प्रवेशद्वारे वाहतुकीसाठी बंद होऊन कारखान्यातील मालाची ने-आण करणाऱ्या मालवाहू वाहनांना कारखान्यांच्या दिशेने वाहतूक करणे कठीण झाल्याचे ठाणे लघू उद्योजक संघटनेचे उपाध्यक्ष ए. वाय. अकोलावाला यांनी सांगितले. तर कल्याण-डोंबिवली येथील औद्योगिक परिसरांमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे या भागातील उद्योजकांकडून सांगण्यात आले.

कल्याण-डोंबिवली शहरांतील मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बसचालक कल्याण डोंबिवली औद्योगिक परिसरातील रस्त्यांवरून प्रवास करतात. दरम्यान, खड्डे पडलेल्या या परिसरातील रस्त्यावरून रसायने तसेच कारखान्यांशी संबंधित मालाची वाहतूक सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या या बसगाडय़ांना या भागात अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चरल असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. त्याचबरोबर भिवंडी आणि अंबरनाथ-बदलापूर येथील औद्योगिक परिसरामध्येही औद्योगिक वसाहतींव्यतिरिक्त इतर बाहेरील वाहन पार्किंगला पेव फुटले आहे. परिणामी कारखान्यात जाणारे मोठे मालवाहू वाहन औद्योगिक परिसरातील रस्त्यावर आल्यास मोठी कोंडी होऊन जात असल्याचे मत येथील उद्योजकांनी व्यक्त केले.

गर्दुल्ल्यांचा उपद्रव

औद्योगिक परिसरातील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळेस उभ्या करण्यात येणाऱ्या रिक्षा तसेच बसगाडय़ांमध्ये गर्दुल्ले दारू तसेच तत्सम मादक पदार्थाचे सेवन करत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. तसेच कारखान्यांमध्ये महिला वर्गदेखील कामाकरिता येत असल्याने महिलांसाठीदेखील हे धोकादायक असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.