अभिहस्तांतरणाचा प्रश्न सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

कळवा-विटावा येथील एमआयडीसीच्या जागेतील गृहनिर्माण संस्थेच्या सातबारावर एमआयडीसीचा हक्क लागल्याने या सोसायटय़ांची मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्वेअन्स) प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता त्यातून मार्ग निघण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनने हा मुद्दा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे उपस्थित केल्यावर एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत चर्चेद्वारे या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

कळवा-विटावा परिसरातील शंभरहून अधिक गृहनिर्माण संस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यापैकी काही इमारती १९८२ पूर्वीच्या म्हणजे ठाणे महापालिका अस्तित्वात येण्याआधीच्या काळातील आहेत. या बहुतेक इमारती या सहकार कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आलेल्या आहेत. काही इमारतींचे आराखडे विटावा ग्रामपंचायत तर काही ठाणे महापालिकेने मंजूर केले आहेत. या ठिकाणच्या अनेक इमारती जुन्या झाल्याने त्यांचा पुनर्विकास करायचा आहे. मात्र जागेच्या सातबारावर एमआयडीसीची नोंद असल्याने पुनर्विकास रखडला आहे, अशी तक्रार हौसिंग फेडरेशनने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती समजल्यावर त्यातून तोडगा काढण्याचे आश्वासन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत एक संयुक्त बैठक बोलावून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. ठाणे जिल्हा हौसिंग फेडरशेनतर्फे याबाबत लवकरच एमआयडीसी, जिल्हाधिकारी तसेच सोसायटय़ांचे सभासद यांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असून ज्या सोसायटय़ांना एमआयडीसीच्या मालकी हक्काबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी हौसिंग फेडरेशनकडे संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.