‘एमआयडीसी’कडून पाणीपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती

कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांचा पाणी प्रश्न दिवसागणिक ज्वलंत होत असताना पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या गावांना चार नवीन नळजोडण्या, २३ जुन्या जोडण्यांचा आकार वाढविणे व तीन जोडण्या मुख्य जलवाहिनीवर स्थलांतरित करण्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात केली आहे. साधारण महिनाभराच्या कालावधीत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आहे. मात्र केवळ वाहिन्यांची दुरुस्ती नाही तर वाढीव पाणी देखील पालिकेने द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

महापालिकेने महामंडळाला पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावास महामंडळाने काही अटींवर मंजुरी दिली होती. यावेळी महापालिकेने २७ गावांची पाणीबिलाची थकबाकी भरल्यास औद्योगिक विकास महामंडळ गावातील नळजोडण्यांचे काम करेल, अशी भूमिका औद्योगिक विकास महामंडळाने घेतली. या गावांची पाणी बिलाची निव्वळ थकबाकी सुमारे ६३ कोटी ९९ लाख रुपये असून एकूण थकबाकी २२६ कोटी ४३ लाख रुपये इतकी आहे. पालिकेने निव्वळ थकबाकी ठरावीक कालावधीत भरावी, अशी सूचना महामंडळाने पालिकेला केली होती. यावर पालिकेने थकबाकीचा केवळ एक हप्ता भरला. त्यानंतर त्याकडे कानाडोळा केला. असे असले तरी महामंडळाने गावकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत गावातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून गावातील नळजोडण्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सोमवारी सोनारपाडा, गोळवली या गावात प्रत्येकी एक तर नांदिवली गावात दोन अशा चार नव्या जलवाहिन्या देण्यात आल्या असून या वाहिन्यांवर मीटर बसविणे अथवा वाढीव पाणीपुरवठा करण्याबाबत पालिकेने अद्याप कोणतीही तयारी दर्शवली नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या घोषणेला वाटाण्याच्या अक्षता

कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांचे शहरीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे. मात्र त्या तुलनेत येथे पायाभूत सुविधांची मात्र वानवा आहे. गावांची लोकसंख्या वाढली मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या नळजोडण्या पूर्वीप्रमाणेच आहेत. त्यामुळे या परिसराला अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. सध्या गावांना दरदिवशी ३० ते ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा औद्योगिक विकास महामंडळाकडून केला जातो. लोकसंख्येच्या मानाने हा पुरवठा अत्यंत अपुरा आहे. त्यात वितरण व्यवस्था सदोष असल्याने त्याचाही पाणीपुरवठय़ावर परिणाम होत आहे. गेल्यावर्षी मे महिन्यापासून या गावकऱ्यांना टॅंकरच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने गावांना ५ दशलक्ष लिटर वाढीव पाणीपुरवठा मिळाल्याची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात आमच्या पदरात अतिरिक्त पाणीसाठा पडलाच नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.