एमआयडीसीकडून सुरक्षा दलास पाचारण
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बुधवारपासून कल्याण-डोंबिवली परिसरातील बेकायदा नळ जोडण्यांविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदा नळ जोडण्यांची मोठी संख्या लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खास सुरक्षा दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी ठाणे लोकसत्ताला दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिन्यांवरून पाण्याची चोरी करून अनेक ठिकाणी सेवा केंद्रे तसेच गाडय़ांच्या देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजेस्मध्ये वापरात आणले जाते. काही ठिकाणी मोठी हॉटेल्स तसेच धाब्यांवरही बेकायदेशीरपणे जोडण्या घेऊन पाण्याचा अमर्याद असा उपसा सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. पाणीटंचाईचा एकंदर वातावरण लक्षात घेऊन खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या बेकायदा जोडण्यांविरोधात बुधवारपासून मोठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थ अथवा पाणी माफियांकडून या कारवाईत अडथळा येऊ नये यासाठी खास सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे. २६ जवानांची ही तुकडी डोंबिवलीत दाखल झाली आहे.
औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे व डोंबिवली पट्टय़ातील सुमारे २२ किमी लांबीच्या जलवाहिनीवर बेकायदा नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. या चोरीमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दररोज पाच दशलक्ष पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईत महामंडळाने ३५० पेक्षा जास्त अनधिकृत जोडण्या काढल्या असून अजूनही आठशे ते हजार नळजोडण्या असण्याची शक्यता असल्याचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी सांगितले.
काटई ते पाले (अंबरनाथ), मलंगगड ते टाटा पॉवपर्यंत असणाऱ्या वीज वाहिनीवर या जोडण्या असून या पट्टय़ातील कारवाईला बुधवारपासून सुरुवात होईल. या कारवाईला स्थानिकांचा होणारा विरोध, मारहाण होऊ नये म्हणून पोलीस संरक्षणात ही कारवाई नेहमी होते. परंतु अनेकदा पोलिसांच्याही तारखा मिळत नसल्याने त्याला विलंब होतो. यामुळे सुरक्षा दल नेमून ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. राज्य राखीव दलाचे सहसंचालक दादासाहेब सोनवलकर हे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. याविषयी सोनवलकर म्हणाले, गोरेगाव येथून हे पथक आले असून कारवाई करताना कोणी अडथळा आणल्यास संबंधितांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्याचे काम आमचे आहे.