News Flash

गाडीच्या प्रतीक्षेत मजूर अस्वस्थ

अखेर पाच ते सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर ही गाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली.

गाडीच्या प्रतीक्षेत मजूर अस्वस्थ

ठाणे : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकातून पाटण्याच्या दिशेने जाणारी विशेष गाडी सोडण्यात येणार होती. मात्र, या गाडीची वाट पाहत हजारो मजूर ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरातील पोलीस ठाण्यांबाहेर बसले होते. अखेर पाच ते सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर ही गाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र, सांयकाळी साडेचार वाजेनंतर गाडी सोडण्याची प्रक्रिया सुरूच होती. बुधवारीही दिवा स्थानकातून गाडी सुटणार असल्याच्या अफवेमुळे शेकडो मजूर दिवा रेल्वे स्थानकात वाट पाहत असल्याचे चित्र होते.

ठाणे स्थानकातून परराज्यात गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांतील बाराशेहून अधिक मजूर पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. या मजुरांना रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी टीएमटीच्या बसगाडय़ाही आणण्यात आल्या होत्या. मात्र, गाडी स्थानकात दाखल व्हायला दुपार उजाडली.  सायंकाळी साडेचार वाजेनंतरही ही गाडी सोडण्याची प्रक्रिया सुरूच होती. मात्र, या कालावधीत मजुरांना काही सूचना मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

अशाचप्रकारे, दिवा रेल्वे स्थानकातून बुधवारी दुपारी १२ वाजता बिहारला जाण्यासाठी विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरली. या चुकीच्या माहितीच्या आधारे दिव्यात राहणारे शेकडो मजुरांचे जथे बुधवारी दुपारी रेल्वे स्थानक परिसरात जमले. गावाला जाण्यासाठी दोन दिवस आधी अर्ज भरण्यासाठी तासन्तास रांग लावल्याने दुपारी १२ वाजेपासून मजुरांनी कुटुंबासह स्थानकात गर्दी केली.

भर उन्हात थांबल्यानंतर सायंकाळी बिहारला जाणारी गाडी आता ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणार असून त्यासाठी दिवा येथील चौकातून ठाण्याला जाण्यासाठी विशेष बस सोडणार असल्याचे या मजुरांना स्थानिकांतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे दिवसभर उपाशी असलेल्या या मजुरांनी दिवा चौक गाठले.

मात्र, दिवा चौकात रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहूनही मजुरांना बस गाडय़ांबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ८ वाजता काही स्थानिकांनी येऊन बिहारला जाणारी गाडी रद्द झाल्याची माहिती या मजुरांना दिली. त्यानंतर या शेकडो मजुरांनी घर गाठले. मात्र, दिवसभर उन्हात उभे राहूनही गाडी न आल्याने मजुरांचा हिरमोड झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 4:06 am

Web Title: migrant workers waiting outside thane railway station for shramik special train zws 70
Next Stories
1 खंडणी उकळण्यासाठी पाकिस्तानी मित्राची मदत
2 शहापूर, मुरबाड तालुक्यांवर पाणीसंकट
3 दररोज ७५ हजार भोजन पाकिटांचे वाटप
Just Now!
X