गतवेळच्या तुलनेत यंदा पाहुण्यांच्या संख्येत वाढ

उत्तरेकडील असह्य थंडीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास हजारो किमीचा हवाई प्रवास करून मुंबई-ठाण्याच्या खाडीकिनारी येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांनी मार्च सुरू होताच परतीची वाट धरली आहे. ठाणे खाडी किनारी, येऊरच्या जंगलात मुक्त विहार करणारे हे पाहुणे पक्षी मार्चमधील उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होताच आपल्या मूळ अधिवासांकडे प्रयाण करतात. यंदाच्या मोसमातही ठाण्यात अनेक पक्ष्यांनी स्थलांतर केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, या वर्षी आसाममध्ये आढळणारा कॉमन शेल्डक आणि तामिळनाडू पट्टय़ात वास्तव्याला असलेल्या लाँग ब्लिड डॉविचर या जातीचे पक्षीही ठाणे खाडीकिनारी आढळल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी नोंदवले आहे.

येऊरमधील हिरवी आणि घनदाट जंगलाची श्रीमंती लाभलेल्या ठाणे शहराला हिवाळ्यात दाखल होणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे विशेष महत्त्व प्राप्त होते. हिवाळ्यात ठाणे जिल्ह्य़ातील वातावरण फार थंड नसल्याने हिमाचल प्रदेशसारख्या बर्फाळ भागातील पक्षी उदरनिर्वाहासाठी येऊरचे जंगल गाठतात. घनदाट जंगल आणि मुबलक खाद्य येऊरच्या जंगलात मिळत असल्याने हजारो किलोमीटरचा प्रवास करत पश्चिम घाटाकडे या पक्ष्यांचे स्थलांतर होते. एशियन पॅरॅडाईज फ्लायकॅचर, वर्डिटर फ्लॅयकॅचर, ब्ल्यू कॅप रॉक थ्रश, इजिप्तशियन वल्चर, एशियन ब्राऊन फ्लायकॅचर, रेड ब्रेस्टेड फ्लॅयकॅचर, अल्ट्रा मरिन फ्लॅयकॅचर, इंडियन पिटा असे पक्षी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश  या भागातून दरवर्षी येऊरच्या जंगलात स्थलांतर करून येतात आणि मार्च महिन्याच्या अखेरीस येऊरच्या जंगलातून मायदेशी परततात, असे पक्षीनिरीक्षक सार्थक आव्हाड यांनी सांगितले. तसेच सायबेरिया, चायना, मंगोलिया, जपान अशा युरोपियन देशातून ठाणे खाडी किनारी कॉमन सँडपायपर, वूड सँडपायपर, सरलिव्ह सँडपायपर, ब्लॅक टेल्ड गोल्डविट, युरेशियन करलू, नॉर्दन शॉवेलर, गार्गेनी, कॉमन टील, नॉर्दन पिनटेल असे पक्षी  दाखल झालेले पक्षी परतीच्या वाटेवर असल्याचे पक्षी निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

या वर्षी दिसलेच नाहीत..

नेहमीच्या पाहुण्या पक्ष्यांनी येऊरचे जंगल आणि ठाणे खाडी किनारी हजेरी लावली असली तरी काही पक्ष्यांच्या शोधात पक्षी निरीक्षक अद्याप आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातून दरवर्षी येऊरच्या जंगलात दाखल होणारा कोतवाल जातीतील रुपेरी कोतवाल (स्पॅन्गल ड्रोंगो) हा पक्षी यंदा दिसला नसल्याची खंत पक्षी निरीक्षक प्रतीक कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तसेच ठाणे खाडी किनारच्या पाणथळ जागेवर आढळणारे रेलिडे जातीतील स्पॉटेड क्रेक, बेलन्स क्रेक, पॅलिड हॅरियर (शिकारी पक्षी )हे पक्षी या वर्षी दिसले नसल्याचे पक्षी निरीक्षक अविनाश भगत यांनी सांगितले. खाडी किनारच्या पाणथळ जागेवर होणारे रेतीचे डंपिंग यामुळे हे पक्षी खाडी परिसरातून नामशेष होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आता कोणते पक्षी पाहायचे?

उन्हाळ्याची झळ सुरू होताच स्थलांतरित पक्षी परत निघाले असले तरी स्थानिक पक्ष्यांना न्याहाळण्यासाठी हा काळ उत्तम असतो.  या काळात स्थानिक पक्षी येऊरच्या जंगलात प्रजननाच्या अवस्थेत असतात. त्यामुळे नर पक्षी मादी पक्ष्याला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. पक्ष्यांच्या या हालचालींचे निरीक्षण करत या पक्ष्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हा काळ उत्तम असल्याचे पक्षी निरीक्षक सार्थक आव्हाड यांनी सांगितले. मार्च महिन्याच्या अखेरीपासून कोकीळाच्या जाती, सनबर्डस, प्रिमिया जातीतील पक्षी, सुतार पक्षी या काळात पाहण्याची उत्तम संधी असते. तसेच ठाणे खाडी किनारी लेसर विसलिंग डक, स्पॉट बिल्ड डक, पेंटेड स्टॉर्क, इगरेट, आयविट असे पक्षी पाहायला मिळतात.