ठाणे : काही दिवसांपूर्वीच सुरू केलेल्या एक हजार खाटांच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयामध्ये प्राणवायूचा पुरेसा साठा नसल्याने आणि नवा साठा येण्यास विलंब होणार असल्याने २६ करोना रुग्णांना शनिवारी रात्री तातडीने पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक धास्तावले होते.

ठाणे शहरात दररोज १५०० ते १८०० रुग्ण आढळत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिका तसेच खासगी रुग्णालयांतील आरोग्य सेवा अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमी  वर तीन नवीन करोना रुग्णालये सुरू करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले होते. त्यापैकी सुमारे एक हजार खाटांचे पार्किंग प्लाझा करोना रुग्णालय काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले. सध्या तेथे पाचशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील १०, तर प्राणवायू  खाटांवरील १६ अशा २६ रुग्णांचा समावेश आहे.  भीती..आणि सुटकेचा नि:श्वास  पार्किंग प्लाझा रुग्णालयातील प्राणवायूचा साठा संपल्यामुळे रुग्णांना ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचे वृत्त शनिवारी सायंकाळी वाऱ्यासारखे पसरले आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. ‘पार्किंग प्लाझा’ बाहेर २० ते २५ रुग्णवाहिकांची रांग लागली होती. तेथील वातावरण पाहून रुग्णांचे नातेवाईक भयभीत झाले होते. परंतु रुग्णालयात प्राणवायूचा पुरेसा साठा नसल्याने आणि नवीन साठा येण्यास उशीर होणार असल्याने रुग्णांना ग्लोबल रुग्णालयात हलविण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

 

पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयात रायगड परिसरातून प्राणवायूचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, तांत्रिक कारणामुळे शनिवारी प्राणवायूचा पुरवठा झाला नाही. तो एक ते दोन दिवसांत होईल. त्यानंतर तेथे नवे रुग्ण दाखल करून घेण्यात येतील. – गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका