घोडबंदरच्या वाघबीळ भागातील दिया या खासगी करोना रुग्णालयामध्ये मंगळवारी प्राणवायूचा साठा संपत आल्यामुळे सात रुग्णांना  सायंकाळी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. पालिकेने रुग्णालयाला दोन मोठे प्राणवायूचे सिलिंडर उपलब्ध करून दिले, पण त्यातही तासभर पुरेल इतकाच साठा असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला. या दरम्यान रुग्णांचे नातवाईक प्रचंड तणावाखाली होते.

ठाणे येथील वेदांत रुग्णालयात चार रुग्णांचा प्राणवायूच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केल्यामुळे संपूर्ण शहर सोमवारी हादरले होते. असे असतानाच मंगळवारी दिया या रुग्णालयामध्ये प्राणवायूचा साठा संपत आल्याच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. त्यानंतर अतिदक्षता विभागातील सात रुग्ण हलविण्यासाठी नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरू झाली. इतर रुग्णालयात जागा आहे का, याची शोधाशोध नातेवाईक करीत होते.

रुग्णालयाचे डॉक्टर हरीश केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयामध्ये एकूण ४२ खाटा असून त्यापैकी १३ अतिदक्षता विभागातील आहेत. या रुग्णालयात एकूण ३२ रुग्ण होते. त्यापैकी ७ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. रुग्णालयातील प्राणवायू साठा संपत आला होता आणि नवीन साठा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे इतर ठिकाणाहून १० छोटे प्राणवायू सिलिंडर आणले होते. तो साठाही मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत पुरेल इतकाच होता. नवीन साठा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे अतिदक्षता विभागातील ७ रुग्ण हलविण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एका रुग्णाचा चाचणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्याला बिगर करोना रुग्णालयात दाखल केले आहे. तर, उर्वरित सहा रुग्णांना हलविण्याची तयारी सुरू असतानाच महापालिकेने दोन मोठे प्राणवायू सिलिंडर देऊ केले होते. पण, त्यातही एक तासभर पुरेल इतकाच साठा होता. त्यामुळे गोकुळनगर येथील आमच्या दुसऱ्या रुग्णालयात सहा रुग्णांना हलविले. तेथेही सकाळपर्यंत पुरेल इतकाच प्राणवायू साठा आहे. १७ सिलिंडर आम्हाला सकाळपर्यंत उपलब्ध होणार आहेत. पण, तोही साठा पुरेसा नाही, असा दावाही डॉ. केदार यांनी केला.

या रुग्णालयाला दोन मोठे प्राणवायू सिलिंडर पालिकेने दिले असून त्यांना आणखी १७ सिलिंडरचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.